राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ओबीसींसंबंधी केलेल्या एका वक्तव्यावरुन सध्या वाद निर्माण झाला आहे. विरोधकही यावरुन आक्रमक झाले असून जितेंद्र आव्हाड यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. भाजपाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमामधील आव्हाड यांच्या भाषणाचा ५१ सेकंदांचा व्हिडीओ ट्विटरला शेअर केला आहे. माझा ओबीसी समाजावर फार विश्वास नाही, असं आव्हाड म्हणाले असल्याचं या व्हिडीओत दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जितेंद्र आव्हाडांनी OBC समाजाचा अपमान केल्याचा भाजपाचा आरोप; Video पोस्ट करत म्हणाले, “NCP राजीनामा…”

दरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या घरावर मोर्चा निघणार असून पोलिसांनी बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे. यावेळी त्यांनी अन्यथा असा उल्लेख करत अप्रत्यक्ष इशाराही दिला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी मोर्चा कोणत्या कारणासाठी येत आहे याचा उल्लेख केला नसला तरी त्यांच्या वक्तव्यावरुन झालेल्या वादामुळेच हा मोर्चा निघणार असल्याचा अंदाज आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीटमध्ये काय म्हटलं आहे –

“उद्या माझ्या घरावर मोर्चा येणार आहे असे समजले. त्यासाठी २ बस पुण्याहून मागविण्यात आलेल्या आहेत. एकाला सांगितले आहे कि तू माजीवाडा नाक्यावर उतर आणि दुसऱ्याला कॅडबरी जंक्शनजवळ उतरायला सांगितले आहे. पोलिसांनी वेळीच बंदोबस्त करावा. अन्यथा……जय भीम!,” असं जितेंद्र आव्हाड ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.

दरम्यान जितेंद्र आव्हाड यांच्या ट्विटनंतर त्यांच्या घराबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. क्युआरटी टीम आणि सिटी पोलीस तैनात करण्यात आले असून कडक सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे.

व्हिडीओत काय म्हणाताना दिसतायत आव्हाड?

“ओबीसींवरती माझा काही फार विश्वास नाही. कारण जेव्हा मंडळ आयोग आला तेव्हा मंडळ आयोगाचं आरक्षण ओबीसींसाठी होतं, पण जेव्हा लढायची वेळ आली तेव्हा ओबीसी लढायला मैदानात नव्हते, कारण ओबीसींना लढायचं नसतं,” असं आव्हाड या व्हिडीओत म्हणताना दिसत आहेत.

भाजपाचं म्हणणं काय?

“ओबीसी समाजाचा अपमान करणारे मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा राजीनामा राष्ट्रवादी काँग्रेस घेणार का?”, असा प्रश्नही भाजपाने उपस्थित केलाय. तसेच “राष्ट्रवादीच्या मनात ओबीसी समाजाबद्दल एवढा राग का?, यासाठीच ओबीसींचे राजकीय आरक्षण घालवंल का?,” असा प्रश्नही भाजपाने विचारलाय. या ट्विटमध्ये आव्हाड आणि राष्ट्रवादीची अधिकृत ट्विटर हॅण्डल टॅग करत त्यांच्यावर निशाणा साधण्यात आला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp jitendra awhad tweet over morcha on house urge police for security sgy
First published on: 05-01-2022 at 09:46 IST