बलात्कार करायचा असेल तर वारांगनांवर करा, पण सुसंस्कृत महिलांवर नको असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या अर्बन सेलच्या अध्यक्षा ज्वाला धोटे यांनी केलं आहे. नागपुरातील वारांगनांनी पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ आंदोलन केलं. पोलिसांनी एका ६० वर्षीय महिलेवर तडीपारीची कारवाई केली असून त्याचा निषेध करण्यासाठी या महिलांनी मानवी साखळी करत आंदोलन केलं. या आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या ज्वाला धोटे यांना प्रसारमाध्यमांशी बोलताना हे वक्तव्य केलं.
“माझ्या समस्त वारांगना माता भगिनी नराधमांना आवाहन करतात की बलात्कार करायचा असेल, शरिराची भूक भागवायची असेल तर आमच्याकडे या पण सुसंस्कृत घरांमधील माता-भगिनींवर वाईट नजर टाकू नका. बलात्कार करायचा असेल तर आमचा करा. तुमची, नराधमांची शरीराची भूक भागवण्यासाठी आम्ही आहोत. पण सुसंस्कृत घरांमधील महिलांवर वाईट नजर टाकू नका,” असं ज्वाला धोटे यांनी यावेळी म्हटलं.
पोलिसांनी नागपुरातील गंगा जमुना या रेड लाईट एरियावर कारवाई केली होती. हा परिसर सील करण्यात आला होता. तेव्हापासून ज्वाला धोटे आक्रमक झाल्या आहेत. ज्वाला धोटे यांनी यावेळी पोलीस आयुक्तांसोबत महाविकास आघाडी सरकारविरोधातही घोषणाबाजी केली.