राष्ट्रवादी युवती काँॅग्रेसच्या राज्यभरातील जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या ‘पितृपक्षा’ पेक्षा वेगळया मार्गाने करण्याचा निर्णय संघटनेच्या कर्त्यांधर्त्यांनी घेतला असून जिल्ह्य़ातील ज्येष्ठ नेत्यांना यात तिळमात्र स्थान राहणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
राष्ट्रीय पातळीवर युवतींचे एकमेव राजकीय व्यासपीठ असल्याचा दावा करणाऱ्या राष्ट्रवादी युवती काँग्रेसने औरंगाबादच्या अधिवेशनात संघटनेची दिशा स्पष्ट केली होती. राष्ट्रवादी काँग्रेस या पितृपक्षाचाच एक घटक ही संघटना आहे. मात्र, पितृपक्षापेक्षा सर्वस्वी वेगळा मार्ग चोखाळणार असल्याचे संघटनेच्या सर्वेसर्वा खासदार सुप्रिया सुळे यांनी निक्षून सांगितले आहे.
 अधिवेशन भव्यदिव्य करण्यासाठी राज्यभरातील पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांना कामाला लावण्यात आले होते. त्यामुळे या नेत्यांनीही ही संघटना आपल्याच ताब्यात राहणार असल्याचे गृहीत धरले. आता त्यांचा भ्रमनिरास होणार आहे.
पुढील काही दिवसात या संघटनेच्या राज्यभरातील जिल्हाध्यक्षांच्या नेमणुका होणार आहेत. पितृपक्षातील सेवादल, महिला काँॅग्रेस, युवक काँॅग्रेस तसेच विविध सेलच्या अध्यक्षपदाच्या नियुक्त्या राकाँॅच्या जिल्हा नेत्यांच्या शिफोरशीनेच आजवर होत आल्या आहेत.
 पण युवती काँॅग्रेसचे जिल्हाध्यक्षपद नेमताना ही वहिवाट धुडकावून लावत मुलाखतीचा मार्ग अमलात येईल. राज्यस्तरीय अधिवेशनात सहभागी झालेल्या युवतींच्या गटनेत्यांचे नाव संघटनेने नोंद करून घेतले आहे. प्रत्येक जिल्ह्य़ातून पाच निवडक युवतींना मुंबईत निमंत्रित केल्या जाईल. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्य त्यांच्या मुलाखती होतील. शैक्षणिक पात्रता, वय, सामाजिक कार्याचा अनुभव, पुढे काम करण्याची व निवडणुकीस उभे राहण्याची तयारी असे मुलाखतीचे काही प्रमुख निकष आहेत.
 या पाच युवतीपैकी प्रत्येकीची राजकीय पाश्र्वभूमी तपासण्यात येईल. ताज्या दमाच्या व कोरी पाटी असणाऱ्या युवतीलाच जिल्हाध्यक्षपद सोपविण्याचे ठरले आहे. त्यामुळे जिल्हा, विभागीय नेत्यांची शिफोरस दावेदारी मजबूत करण्याऐवजी कमकुवत करणारीच ठरेल.
नियुक्त झालेल्या जिल्हाध्यक्षांना ठराविक मासिक मानधन देण्याचे प्रस्तावित आहे. पक्षाच्या जिल्हा कार्यालयात जिल्हाध्यक्षांना स्वतंत्र स्थान मिळेल. राष्ट्रवादी काँॅग्रेसचे प्रमुख नेते या विषयी बोलायला तयार नाहीत.
 पण अधिवेशनाने उत्साहित होऊन आलेल्या एका गटनेत्या युवतीने या विषयी माहिती देताना स्पष्ट केले की, आगामी राजकारणासाठी व प्रामुख्याने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये युवती काँग्रेसचा वरचष्मा असावा, अशी ही तयारी आहे. या संघटनेत काम करण्याची पहिली पायरी राष्ट्रवादी युवती मंच हे व्यासपीठ आहे. गाव, प्रभाग किंवा महाविद्यालयात १८ ते ३५ वयोगटातील युवती असा मंच स्थापन करू शकतील. एक मंचात १० ते ५० युवती राहतील.
 मंचातील सदस्यांना महत्त्वाच्या वाटणाऱ्या स्थानिक सामाजिक प्रश्नांना घेऊन काम करण्याचे स्वातंत्र्य राहील. मात्र या मंचाची नोंदणी पक्षाच्या अध्यक्षाकडे करणे आवश्यक आहे.
 प्राथमिक स्तरावर पदयात्रा, पथनाटय़े, प्रभातफे री स्वरूपातील कार्यक्रम  असून विविध मोहिमा, मतदार नोंदणी अभियान, स्त्री भ्रूणहत्याबंदी, छेडखानी व अन्य विषयावर चालविण्यात येणार आहे. युवतींची मतदारयादीत नोंदणी करण्याला प्राधान्यक्रम देण्यात आला आहे.
राज्यभरातील युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या आटोपताक्षणीच गावपातळीपासून संघटनेचा धडाका लावण्याचा संघटना नेत्यांचा मनोदय आहे. इतर राजकीय पक्षांपेक्षा व पितृपक्षापेक्षा ही संघटना आगळीवेगळी करण्याचा हेतू ठेवून होणाऱ्या नियुक्त्या, त्यामुळेच पक्षांतर्गत अस्वस्थता निर्माण होण्याचे कारण ठरले आहे.     

Story img Loader