राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी “ज्या घरात वाढलो तेच घर उद्ध्वस्त करणे ही बेईमानी आहे आणि ती जनतेला पटलेली नाही,” असं मत व्यक्त केलंय. तसेच सत्तेवर आल्यावर पक्षाच्या अनेक नेत्यांना आमिषे दाखविली जात आहेत, असा गंभीर आरोपही केला. ते शुक्रवारी (४ नोव्हेंबर) अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथे राष्ट्रवादीच्या मंथन शिबिरात बोलत होते. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबाबतही मार्गदर्शन केलं.
अजित पवार म्हणाले, “सत्तेवर आल्यावर पक्षाच्या अनेक नेत्यांना आमिषे दाखविली जात आहेत. त्यांच्या खोट्या प्रचाराला बळी पडू नका. जे पक्ष सोडून गेले ते आज अस्वस्थ आहेत. ते नेते तसे बोलून दाखवत आहेत. ज्या घरात वाढलो तेच घर उद्ध्वस्त करणे ही बेईमानी जनतेला पटलेली नाही. शिवसेना नाव आणि त्यांचे चिन्ह गोठवले तेही जनतेला रुचले नाही.”
“जनतेचा एकनाथ शिंदे यांच्यावर प्रचंड राग”
“जनतेचा एकनाथ शिंदे यांच्यावर प्रचंड राग आहे. बच्चू कडू यांनी एका वाहिनीवर मुलाखतीत मुख्यमंत्री म्हणून पद मिळवले ते ठीक आहे, परंतु पक्षावर दावा करणे योग्य नाही असे स्पष्ट मत व्यक्त केले आहे. राक्षसी महत्त्वकांक्षा योग्य नाही,” अशी टीका अजित पवारांनी केली.
“पाचही जागा आघाडीच्या येण्यासाठी जीवाचे रान करा”
अजित पवारांनी आगामी निवडणुकांबाबत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आवाहन केलं. ते म्हणाले, “सत्तेच्या माध्यमातून लोकांच्या विकासाकडे लक्ष दिले पाहिजे. फेब्रुवारी २०२३ मध्ये पाच निवडणूका होत आहेत. याबाबत सर्व पक्षाच्या लोकांना घेऊन चर्चा करण्यात आली आहे. या निवडणूका आघाडी म्हणून लढवल्या जाणार आहेत. या पाचही जागा आघाडीच्या कशा येतील त्यासाठी जीवाचे रान केले पाहिजे.”
“…तोपर्यंत आघाडीचा विचार न करता स्वतंत्र लढायचं त्यादृष्टीने कामाला लागा”
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत निवडून आलेले कार्यकर्तेच पक्षाला ताकद देतात. त्यातून आमदार, खासदार तयार होतात. हेच लोक लोकसभा, विधानसभा निवडणुकीची वाट सोपी करणारे आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपल्या विचारांची माणसे निवडून आणावीत. पक्षाकडून निर्णय येईल याची वाट बघत बसू नका. निर्णय येईल तेव्हा येईल, तोपर्यंत स्वतंत्र लढायचं आहे त्यादृष्टीने कामाला लागा,” असे आवाहन अजित पवार यांनी केले.
“लोकशाही व्यवस्थेला नख लावण्याचे काम होतेय”
“लोकशाही व्यवस्थेला नख लावण्याचे काम होतेय, मात्र, ते कधीही यशस्वी होणार नाही. सर्व निवडणुका वेळेत होणे आवश्यक आहे, परंतु निवडणूकांना विलंब लावला जात आहे. हे लोकशाहीच्या दृष्टीने योग्य नाही. निवडणूका वेळेत होणे याकडे राज्य निवडणूक आयोगाने लक्ष दिले पाहिजे. त्यांची ती जबाबदारी आहे,” असेही अजित पवार यांनी नमूद केले.
“शेतकऱ्यांची दिवाळी काळी झाली आहे”
अजित पवार पुढे म्हणाले, “यंदा राज्यात अतिवृष्टीमुळे शेतजमिनीचे आणि पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. आत्महत्या वाढल्या आहेत. शेतकऱ्यांची दिवाळी काळी झाली आहे. विम्याची भरपाई द्या अशी मागणी केली आहे. ओला दुष्काळ जाहीर करा सांगून तो जाहीर केला नाही. हे १३ कोटी जनतेचे दुर्दैव आहे.”
हेही वाचा : “यांना दिल्लीत गेल्यावर तोंड वर करून बोलण्याचा…”, अजित पवार यांचा शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल
‘राष्ट्रवादी मंथन वेध भविष्याचा’ हे ब्रीद वाक्य घेऊन आपण हे शिबीर करत आहोत. येणाऱ्या भविष्यात पक्षाने काय केले पाहिजे, कसे वागले पाहिजे, कोणत्या पध्दतीने काम केले पाहिजे आणि पक्षाची पुढची वाटचाल ठरवण्यासाठी हे शिबीर असल्याची माहिती अजित पवारांनी दिली.