महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकार लवकरच पडेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. त्यातच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी या सरकारच्या स्थिरतेबाबत मोठं विधान केलं आहे. “जोपर्यंत १४५ आमदार एकनाथ शिंदेंच्या पाठिशी आहेत, तोपर्यंत हे सरकार चालेल. ज्यादिवशी हा आकडा कमी होईल, त्या दिवशी हे सरकार जाईल”, असं अजित पवार म्हणाले आहेत. राज्यातील एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली सत्तेत असलेलं सरकार राष्ट्रवादीच्या अधिवेशनानंतर पडेल, असं भाकित राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी वर्तवलं आहे. त्यांच्या या भाकितानंतर अजित पवार यांनी सरकारच्या भवितव्याबाबत हे वक्तव्य केलं आहे.
“राष्ट्रवादीच्या अधिवेशनानंतर शिंदे-फडणवीस सरकार पडणार”, जयंत पाटील यांचं मोठं विधान!
राष्ट्रवादीच्या नेत्यांनी वर्तवलेल्या भाकिताबाबत पत्रकारांनी अजित पवार यांना प्रश्न विचारला. तेव्हा याबाबत त्यांनाच विचारा, असं प्रत्युत्तर पवारांनी दिलं. “त्यांचं मत त्यांना लखलाभ”, असं म्हणत नेत्यांच्या वक्तव्यावर आणखी भाष्य करणं पवार यांनी टाळलं. शिर्डीमध्ये आजपासून राष्ट्रवादीचं दोन दिवसीय मंथन शिबीर सुरू होत आहे. या अधिवेशनासाठी राष्ट्रवादीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते शिर्डीत दाखल झाले आहेत. दरम्यान, महाराष्ट्राबाहेर गेलेल्या प्रकल्पावरुन अजित पवारांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. शिंदे आणि फडणवीसांच्या अपयशामुळेच हे प्रकल्प राज्याबाहेर गेल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या प्रकल्पांबाबत सविस्तर माहिती असल्याचा दावा त्यांनी केला आहे. शिर्डीतील राष्ट्रवादीच्या अधिवेशनात याबाबत माहिती देणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
“महाराष्ट्रासाठी घोषणा होत आहेत म्हणजे…” अरविंद सावंतांनी वर्तवलं भाकित; म्हणाले, “आता राज्याला…”
दरम्यान, सरकारबाबत जयंत पाटलांच्या वक्तव्याला राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी ‘टीव्ही ९’ शी बोलताना दुजोरा दिला आहे. “सध्याच्या सरकारबद्दल शेतकऱ्यांच्या मनात प्रचंड रोष आहे. आज कार्तिकी एकादशी आहे. आषाढी आणि कार्तिकीची महापूजा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री करतात. पण येणाऱ्या आषाढीची शासकीय महापूजा महाविकास आघाडीचेच मुख्यमंत्री करतील. आम्हाला विश्वास आहे की १०० च्यावर आमदार आम्ही निवडून आणू. आगामी काळात राष्ट्रवादीचेच मुख्यमंत्री महाराष्ट्रात दिसतील” असे मिटकरी म्हणाले आहेत.