Ajit Pawar Reaction on Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शुक्रवारी म्हणजेच ५ मे या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेतला. मी तुम्हा सगळ्यांच्या भावनांचा अपमान करु इच्छित नाही असं राजीनामा मागे घेताना शरद पवार यांनी म्हटलं आहे. शरद पवार यांनी हा निर्णय जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी एकच जल्लोष केला. मात्र या प्रसंगी अजित पवार हे अनुपस्थित होते. अजित पवार या पत्रकार परिषदेत अनुपस्थित का? याच्याही चर्चा रंगल्या. मात्र आता या प्रकरणी अजित पवारांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
काय म्हटलं आहे अजित पवार यांनी?
“राज्यातील, देशातील सर्व पक्षीय नेते आणि कार्यकर्ते यांचा आग्रह मान्य करून आदरणीय शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कायम राहण्याचा घेतलेला निर्णय माझ्यासह पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा उत्साह वाढवणारा आहे. महाविकास आघाडी, देशातील विरोधी पक्षांची एकी यांना बळ देणारा आहे. आदरणीय शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी कायम राहण्याच्या निर्णयाचं मी स्वागत करतो. आपल्या सर्वांच्या आग्रहाखातर त्यांनी हा निर्णय घेतला असून त्यांचं वय आणि प्रकृतीची काळजी घेऊन आपण सर्वांनी येणाऱ्या काळात अधिक जबाबदारी उचलावी. एकजुटीने आणि अधिक जोमाने काम करावं, साहेबांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक मजूबत करावा असं आवाहन मी करतो. साहेबांच्या निर्णयानंतर आम्ही सर्वजण पुन्हा नव्या जोमाने पक्षाच्या कामाला लागलो आहोत.” असं ट्वीट करत अजित पवार यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
साहेबांनी राष्ट्रीय अध्यक्षपदी कायम रहावं या आग्रहास्तव अध्यक्ष निवड समितीनं त्यांच्या निवृत्तीचा निर्णय फेटाळून लावला.तेच अध्यक्षपदी कायम राहतील,हा निर्णय एकमतानं झाला.राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे एक कुटुंब असून साहेबांच्या नेतृत्वाखाली पक्ष राज्यात,देशात उज्ज्वल यश संपादन करेल. असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.
शरद पवार यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेतल्याची घोषणा केली तेव्हा पत्रकार परिषदेला अजित पवार उपस्थित नव्हते. त्याच्या अनुपस्थितीबाबतही अनेक तर्क-वितर्क लावले जात होते. पत्रकार परिषदेला अजित पवार उपस्थित नसल्याबाबत खुद्द शरद पवारांनीही स्पष्टीकरण दिलं. शरद पवार म्हणाले की, “प्रत्येकजण पत्रकार परिषदेला उपस्थित राहू शकत नाही. काही लोक इथे आहेत आणि काही नाहीत.”
राजीनामा मागे घेताना शरद पवार यांनी काय म्हटलं आहे?
“२ मे रोजी पुस्तक प्रकाशनात मी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केला होता. सार्वजनिक जीवनातील 63 वर्षांच्या सेवेनंतर या जबाबदारीतून मुक्त व्हावं ही माझी इच्छा होती. पण त्यामुळे जनमाणसांत तीव्र भावना उमटली. राष्ट्रवादीचे असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी आणि माझे सांगाती असलेली जनता यांच्यात अस्वस्थता निर्माण झाली.”
“या निर्णयाचा मी फेरविचार करावा याकरता माझे हितचिंतक, माझ्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते, चाहते यांनी मला आवाहन केलं. तसेच देशभरातून विशेषत: महाराष्ट्रातून इतर सहकारी पक्षातील नेते, कार्यकर्ते यांनी मी ही जबाबदारी पुन्हा घ्यावी अशी विनंती केली.”, असं शरद पवार म्हणाले.
“लोक माझे सांगाती, हे माझ्या प्रदीर्घ आणि समाधानी सार्वजनिक जीवनाचं गमक आहे. माझ्याकडून या भावनांचा अनादर होऊ शकत नाही. या लोकांच्या प्रेमानं मी भारवून गेलो. तुमच्या सर्वांकडून आलेलं आवाहन, आणि पक्षातील जेष्ठ नेत्यांकडून घेण्यात आलेला निर्णय यावरून मी सर्वांचा मान राखत मी माझा निर्णय मागे घेत आहे.”