महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर महाराष्ट्रात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार अस्तित्वात आलं आहे. पण अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला नाही. असं असलं तरी शिंदे-फडणवीस सरकारने महाविकास आघाडीकडून घोषित केलेल्या अनेक योजनांचा निधी रोखला आहे किंवा स्थगिती दिली आहे.
यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. सरकारमध्ये आला आहात आता राज्याच्या समस्या तरी सोडवा, असा खोचक सल्लाही अजित पवारांनी दिला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
“मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं” या चंद्रकांत पाटलांच्या विधानावरून अजित पवारांनी जोरदार टोलेबाजी केली आहे. त्यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं की, “भूकंप-भूकंप करणाऱ्यांनी राज्य ताब्यात घेतलंय ना, ते आता व्यवस्थित चालवा. ज्या समस्या आहेत, त्या सोडवा. एकनाथ शिंदे यांना सोबत घेऊन आणि एवढं बहुमत मिळूनही समाधान झालं नाही का? अजून किती मोठी भूक आहे, ते तरी एकदा कळू द्या.”
हेही वाचा- गुलाबराव पाटलांची उद्धव ठाकरेंविरोधात नाराजी, अखेर मनातील खदखद आली बाहेर
“सरकारमध्ये येण्यापुरती भूक होती, ती छाताडावर की कुठेतरी दगड, धोंडा ठेऊन भागवली आहे ना? बरं झालं मोठा दगड ठेवला नाही, नाहीतर जीवच गेला असता, म्हणजे झेपेल असाच दगड ठेवला” असा टोला अजित पवारांनी चंद्रकांत पाटलांना लगावला आहे.
हेही वाचा- बंडखोर आमदार गुलाबराव पाटलांची आदित्य ठाकरेंवर बोचरी टीका, म्हणाले, “गेल्या अडीच वर्षात कधीही…”
दरम्यान, दैनंदिन वापरातील खाद्यपदार्थांवर लावलेल्या जीएसटीवरून अजित पवार यांनी केंद्र सरकारवरही टीका केली आहे. सध्या देशात महागाई वाढत असताना, दूध, दही यांसारख्या दूग्धजन्य पदार्थांवर जीएसटी लावून गरीब आणि मध्यमवर्गीय जनतेची चेष्टा करू नका, असंही अजित पवार म्हणाले.