भारतीय जनता पार्टीचे नेते चंद्रकांत पाटील यांनी अलीकडेच महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केलं आहे. फुले, आंबेडकर आणि कर्मवीर हे अनुदानासाठी सरकारवर अवलंबून राहिले नाहीत. त्यांनी भीक मागून शाळा सुरू केल्या, अशा आशयाचं विधान चंद्रकांत पाटलांनी केलं. चंद्रकांत पाटलांच्या या विधानानंतर विविध राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही चंद्रकांत पाटलांवर टीकास्र सोडलं आहे. पुण्यातील एका कार्यक्रमात अजित पवार म्हणाले, “फुले-आंबेडकरांनी अनुदानासाठी सरकारवर अवलंबून न राहता, त्यांनी भीक मागून शाळा सुरू केल्या, असं विधान आपले पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं. वाह रे पठ्ठ्या… आपण रक्कम दिली तर त्याला देणगी दिली, असं म्हणतो किंवा लोकवर्गणी दिली म्हणतो. त्या काळात भाऊराव पाटील यांनी ‘कमवा आणि शिका’ योजना सुरू केली होती. जुन्या लोकांना हे आठवत असेल. प्रत्येकानं शिक्षण घेतलं पाहिजे, हा भाऊराव पाटील यांचा विचार होता.
हेही वाचा- ‘समृद्धी’चं उद्घाटन करताना मोदी आम्हालाही टोमणे मारतील, पण…”, उद्धव ठाकरेंचा खोचक टोला!
“त्या काळात काही लोकांनी कर्मवीरांना शाळेसाठी जमिनी दिल्या. तर काही लोकांनी खोल्या बांधून दिल्या होत्या. याचा अर्थ त्यांनी भीक मागितली का? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भीक मागितली का? कुठले शब्द कसे वापरायचे? यांचं भान राखलं पाहिजे. अरे तुम्ही पुण्यासारख्या ‘विद्येचं माहेरघर’ असलेल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहात,” असंही अजित पवार म्हणाले.
हेही वाचा- “मी जर मुख्यमंत्री असतो ना…”, अब्दुल सत्तारांचा समाचार घेताना उद्धव ठाकरेंनी शिंदे सरकारला सुनावलं!
उपस्थित नागरिकांना उद्देशून बोलताना अजित पवार पुढे म्हणाले, “ही जी भाषा वापरली जातेय, ही बदलण्याची खरी ताकद तुमच्यात आहे. कुणाला निवडून द्यायचं आणि कुणाला घरी पाठवायचं आणि कुणाला शेती बघायला लावायची, हे तुमच्या हातात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून मतदानाच्या अधिकाराअंतर्गत हा अधिकार तुम्हाला दिला आहे.”