महाराष्ट्रात एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून राज्यातील जिल्ह्यांना पालकमंत्री कधी मिळणार? हा प्रश्न विरोधकांकडून सातत्याने विचारला जात होता. अखेर शनिवारी पालकमंत्र्यांची घोषणा झाली आहे. शिदे-फडणवीस सरकारमधील विविध नेत्यांकडे पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
पण देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पालकमंत्री म्हणून सहा जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. यावरून विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला आहे. माझ्याकडे पुणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद होतं, तर माझ्या नाकीनऊ येत होतं, ते सहा जिल्ह्यांचा कारभार कसा सांभाळणार आहेत? असा सवाल अजित पवारांनी विचारला आहे. ते बारामतीत बारामती सहकारी बँकेच्या ६१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते.
हेही वाचा- “शिवतीर्थावर उद्धव ठाकरेंची सभा झालीच पाहिजे, पण…” शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटलांचं विधान चर्चेत
यावेळी अजित पवार म्हणाले की, शनिवारी शिंदे-फडणवीस सरकारने पालकमंत्र्यांची घोषणा केली. काही जिल्ह्यांमध्ये एकच पालकमंत्री दिले आहेत. तर काही पालकमंत्र्यांकडे दोन जिल्हे दिलेआहेत. माझ्या माहितीप्रमाणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे सहा जिल्हे देण्यात आले आहेत. माझ्याकडे पुण्याचं पालकमंत्रीपद होतं, तर माझ्या नाकी नऊ येत होतं. आठवड्यातून किमान एक दिवस मला जिल्ह्यासाठी द्यावाच लागत होता. त्यामुळे ज्यांच्याकडे सहा-सहा जिल्हे दिले आहेत, ते त्यांना कसं पेलवणार आहे, हे मला माहीत नाही, परंतु त्यांना माझ्या शुभेच्छा, असं अजित पवार भाषणात म्हणाले आहेत.