शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेना पक्षाला खिंडार पडलं आहे. पक्षात फूट पडल्यानंतर शिंदे आणि ठाकरे गटाने ‘शिवसेना’ नाव आणि ‘धनुष्यबाण’ पक्षचिन्हावर आपला दावा सांगितला. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं असून याची सुनावणी संपली आहे. न्यायालयाने आपला निकाल राखीव ठेवला आहे. सर्वोच्च न्यायालय कुणाच्या बाजुने निर्णय देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान, विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने काहीही निकाल दिला, तरी मूळ शिवसैनिक आणि मतदार अद्याप उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभा आहे, असं विधान अजित पवार यांनी केलं. ते बारामती येथे एका कार्यक्रमात बोलत होते.
हेही वाचा- “आम्हाला आई-बहिणीवरून…”, उदयनराजेंच्या ‘त्या’ आरोपाला शिवेंद्रराजे भोसले यांचं प्रत्युत्तर
यावेळी अजित पवार म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयात निकाल काय लागेल? याबाबत वेगवेगळे मतप्रवाह आहेत. सर्वोच्च न्यायालय जो निर्णय देईल, त्याची अंमलबजावणी सगळ्यांना करावी लागणार आहे. निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांचं पक्षचिन्ह आणि पक्षाचं नाव काढून घेतलं असलं तरी, राज्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा शिवसैनिक आहे. ठरावीक लोक इकडे-तिकडे गेले आहेत. पण मूळ शिवसैनिक कुठेही हलला नाही. त्यांचा (उद्धव ठाकरे) मतदारही कुठेही हलला नाही.
हेही वाचा- सावरकर वादावर राष्ट्रवादीकडून पहिल्यांदाच भूमिका जाहीर, शरद पवारांचा उल्लेख करत अजित पवार म्हणाले…
“उद्धव ठाकरे हे आपल्या भूमिकेपासून दूर गेले नाहीत. त्यांनी सावरकरांबद्दल त्यांची भूमिका काय आहे? हे परवा मालेगावात सांगितलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला सगळ्या महापुरुषांबद्दल आदर आहे. आपण सगळ्यांनी नेहमी महापुरुषांबद्दल सन्मान आणि आदराचीच भावना ठेवली पाहिजे. काँग्रेसने आपली भूमिका मांडावी. पण आम्ही (राष्ट्रवादी काँग्रेस) सर्व जाती-धर्माला बरोबर घेऊन पुढे जात आहोत. सर्वधर्म समभाव हीच आपली भूमिका आहे. त्यामध्ये आपल्याला अंतर पडू द्यायचं नाही. आपल्याला प्रत्येक जातीचा, धर्माचा आणि पंथाचा आदर करायचा आहे” असंही अजित पवार यांनी नमूद केलं.
हेही वाचा- खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधींना आणखी एक धक्का, लोकसभा हाऊस कमिटीने बजावली ‘ही’ नोटीस
“कोणत्याही दोन समाजात तेढ निर्माण होणार नाही. दरी निर्माण होणार नाही, हीच शरद पवारांची भूमिका आहे. शाहू-फुले-आंबेडकर यांची भूमिका आणि त्यांच्या विचारसरणीने आपण पुढे चाललो आहोत. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी आपण काही बाबतीत एकत्र येतो,” असं वक्तव्य अजित पवारांनी केलं आहे.