राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केलं आहे. भाजपाकडे अटल बिहारी वाजपेयी, मुरली मनोहर जोशी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्यासारखं नेतृत्व असताना त्यांना जे जमलं नाही, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करून दाखवलं, असं विधान अजित पवार यांनी केलं. ते ‘सकाळ’ वृत्त समूहाने घेतलेल्या एका मुलाखतीत बोलत होते.
देशाच्या सध्याच्या राजकीय स्थितीवर भाष्य करताना अजित पवार म्हणाले, “भारतीय जनता पार्टी २०१४ आणि २०१९ मध्ये सर्वदूर पोहोचली. याला एकमेव कारण नरेंद्र मोदी हे आहेत. नरेंद्र मोदींचा करिश्मा देशात चालला. त्यांनी देशात तसा विश्वास संपादन केला किंवा आपल्या भाषणातून जनतेला आपलंसं करण्याचं काम केलं. यामुळे जनतेला वाटलं आता देशाची सूत्रं यांच्या हातात द्यावीत.”
“विशेष म्हणजे अटल बिहारी वाजपेयी, मुरली मनोहर जोशी, लालकृष्ण अडवाणी यांच्यासारखे सर्वांना बरोबर घेऊन जाणारे नेतृत्व भाजपाकडे होते. त्यावेळी त्यांना जे जमलं नाही, ते नरेंद्र मोदींनी करून दाखवलं, भाजपाला पूर्ण बहुमत कधीच मिळालं नव्हतं. ते बहुमत मिळवून देण्याचं काम नरेंद्र मोदींनी केलं,” अशा शब्दांत अजित पवारांनी नरेंद्र मोदींचं कौतुक केलं.
हेही वाचा- शिंदे गटाच्या गाड्या पद्धतीशीर राज्याबाहेर कशा गेल्या? अजित पवारांनी सांगितला नेमका घटनाक्रम!
अजित पवार पुढे म्हणाले, “१९८४ नंतर पहिल्यांदा देशात २०१४ साली बहुमत असलेलं सरकार अस्तित्वात आलं. तोपर्यंत कोणत्याही एका पक्षाला पूर्ण बहुमत नव्हतं. २००९ सालीही डॉ. मनमोहन सिंग यांना इतर पक्षांची मदत घ्यावी लागली. त्यानंतर नरेंद्र मोदींनी देशात आपला करिश्मा निर्माण केला, हे तथ्य नाकारता येत नाही. पण आज नरेंद्र मोदी यांच्यानंतर कोण? असा प्रश्न विचारला तर कोणतंही नाव समोर येत नाही.”