निवडणूक आयोगाने ‘शिवसेना’ हे नाव आणि ‘धनुष्यबाण’ हे पक्षचिन्ह शिंदे गटाला दिलं आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर महाराष्ट्रातील विविध राजकीय नेत्यांसह सामन्य नागरिकांकडून प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. निवडणूक आयोगाचा निकाल अतिशय अनपेक्षित आहे, असं अजित पवारांनी म्हटलं आहे. ते कोल्हापूर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
निवडणूक आयोगाच्या निकालावर भाष्य करताना अजित पवार म्हणाले, “निवडणूक आयोगानं अतिशय अनपेक्षित निकाल दिला आहे. खरं तर, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाकडे मागणी केली होती की, हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. तेथील सुनावणी संपेपर्यंत निवडणूक आयोगानं काहीही निर्णय घेऊ नये.
“आज सकाळी सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की, २१ फेब्रुवारी पासून आम्ही सत्तासंघर्षावर सलग सुनावणी घेणार आहोत. दोन्ही बाजुंचे म्हणणं ऐकून घेणार आहेत. त्यानंतर निर्णय देणार, असं न्यायालयाने सांगितलं. असं असताना निवडणूक आयोगानं एवढी घाई का केली? हे कळायला मार्ग नाही. निवडणूक आयोगानं तो निकाल दिला असला तरी माझं स्वत:चं मत आहे की, उद्धव ठाकरे या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जातील. न्यायालयाकडे न्याय मागतील. उद्धव ठाकरे यांच्याबरोबर मी काम केलंय म्हणून हे सांगत नाही. तर एक त्रयस्थ नागरिक म्हणून मी हे सांगत आहे. महाराष्ट्रातला शिवसैनिक हा उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभा राहील. तसेच त्यांच्या विचाराचेच आमदार-खासदार निवडून येतील, असं माझं ठाम मत आहे”, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.