मागील काही दिवसांपासून नर्तिका गौतमी पाटील विविध कारणांमुळे चर्चेत आहे. ती अश्लील नृत्य करते, असा आरोप अनेकांनी केला असून तिच्या कार्यक्रमांवर बंदी घालावी, अशी मागणीही काहीजणांनी केली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी गौतमी पाटीलच्या वादात उडी घेतली आहे.
लावणी किंवा इतर कोणतेही कार्यक्रम सर्वांना पाहता येतील, अशा प्रकारे आयोजित केले पाहिजे. अशा कार्यक्रमांमध्ये अश्लील प्रकार घडता कामा नयेत. काही जिल्ह्यांमध्ये अशा कार्यक्रमांवर बंदी आहे. पण काही जिल्ह्यात असे कार्यक्रम सुरू आहे. मी संबंधितांशी बोलणार आहे. वेळ पडली तर येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशानात हा मुद्दा उपस्थित करणार आहे, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे. अजित पवारांच्या या भूमिकेमुळे महाराष्ट्रात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांवर बंदी येणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
हेही वाचा- “गाईला पुढून मिठी मारली तर शिंग मारेल अन् मागून मिठी मारली तर…”, आव्हाडांची तुफान टोलेबाजी!
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अजित पवार म्हणाले, “महाराष्ट्राची काही परंपरा आहे. आपल्याकडे लावणी किंवा इतर विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. पण ते कार्यक्रम सर्वांना पाहता येतील, अशाप्रकारे आयोजित केले पाहिजे. त्यामध्ये कोणताही अश्लील प्रकार होता कामा नये. दुर्दैवाने मला काल अशी माहिती मिळाली की, काही जिल्ह्यांमध्ये अशा कार्यक्रमांवर बंदी आहे. पण काही जिल्ह्यांत ते चालू आहे.”
“हा प्रकार नेमका काय आहे? याबाबत मी संबंधितांशी बोलणार आहे. वेळ पडली तर येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करणार आहे. महाराष्ट्रात अशाप्रकारचे कार्यक्रम घडता कामा नयेत. महाराष्ट्राची उच्च परंपरा आहे. पहिल्यापासून आपल्या वडिलधाऱ्यांनी ही परंपरा चालवत आणली आहे. ती परंपरा टिकली पाहिजे. त्यामुळे कुणी चुकीचं वागत असेल तर त्याला पायबंद घातला पाहिजे,” असा थेट इशारा अजित पवारांनी दिला आहे.