निवडणुका जवळ आल्या की चुनावी जुमले सुरु होतात. सूक्ष्म, लघु उद्योगाला ५९ मिनिटात एक कोटी कर्ज देणार सांगतात. हे इतकं कर्ज कसं देणार, शक्य तरी आहे का? निवडणुकीसाठी हे सर्व सुरु आहे. सत्तेत आल्यावर म्हणणार हा चुनावी जुमला होता. सरकारने नुसता दुष्काळ जाहीर केला. काहीच नियोजन नाही. भाजप सरकारचा भोंगळ कारभार सुरू आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. ते पिंपरी-चिंचवडमध्ये बोलत होते.
पिंपरीत नेत्यांना मंत्रीपद, महामंडळ याची आमिष दाखवली होती. पण काय मिळालं तुम्हाला दिसतंय. भाजप सरकार बनवाबनवी करत आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा बाधण्यामागे भाजपाच राजकारण आहे. निवडणूक जवळ आल्यावर राममंदिराचा मुद्दा काढला. समाजात धृवीकरण करायचय. निवडणुका आल्या की शिवसेना, भाजपाला राम आठवतो.
आज पिंपरी चिंचवडमध्ये मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड सुरु आहे. त्यावर अजित पवार यांनी टीका केली. हुकूमशाही पध्दतीने भाजप व राज्यकर्ते काम करत आहेत. चंद्रकात पाटील काय म्हणतात. राफेल बाबत सरकार कोर्टाला सांगतय सुरक्षेच्या दृष्टीने सर्व गुप्तता ठेवण्यात आलीय. म्हणजे हे कोर्टाला सुरक्षा शिकवणार.
शिवसेना थेट भाजपावर विखारी टीका करतेय तरी भाजप नेते शांत आहेत. काल झालेल्या बैठकीत ४८ जागांपैकी तीन चतुर्थांश जागांवर आघाडीचं एकमत झालंय. समविचारी पक्षांनी एकत्र येण्यासाठी आम्ही आग्रही आहोत. अगदी प्रकाश आंबेडकर आमच्याबद्दल काही बोलले असले तरी आम्ही त्यांच्यासोबत पुन्हा चर्चेसाठी तयार आहोत असे अजित पवार म्हणाले.
आता ज्या जागांवर एकमत झालंय, त्यापैकी काही जागा आम्ही मित्रपक्षांना देणार आहोत. मनसेला आघाडीत घेणार का? यावर समविचारी पक्ष एकत्र येतील असं सूचक विधान करत कालच्या बैठकीत मनसे बद्दल चर्चा झाली नसल्याचं स्पष्ट केलं. शिवसेना जातीयवादी पक्ष असल्याने महाअघाडीत ते नसतील.
मंत्रिमंडळ विस्तार म्हणजे गाजर दाखवण्याच काम. जे सत्तेला हपापले आहेत. त्यांना गाजर आहे. भाजप शिवसेनेची आघाडी झाली किंवा नाही तरी काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस युती होणार. गेल्या वेळेस युती नसल्याने त्याची किंमत सर्वाना मोजावी लागली असे अजित पवार म्हणाले.