राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पिण्याच्या पाण्याच्या मुद्द्यांवरून मिश्किल टिप्पणी केली आहे. घरगुती पाणी कनेक्शन मिळवण्यासाठी लागणारे शुल्क भरण्यास तयार नसलेल्या नागरिकांना उद्देशून अजित पवारांनी हे विधान केलं आहे. लोकांना सगळ्याच गोष्टी फुकटात दिल्या तर स्वर्गातून ब्रह्मदेव आला तरी लोकांना पुरायचं नाही, असंही अजित पवार म्हणाले. ते अहमदनगर येथे एका कार्यक्रमात बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लोकांच्या पिण्याच्या पाणी प्रश्नावर अजित पवार म्हणाले, “पिण्याच्या पाण्याच्या योजनांची कामं आपल्या परिसरात सुरू आहेत. बाकीच्या काही भागांतही सुरू आहेत. त्यात सरकारनेही काही नियम केले आहेत. उंच टाकी किंवा पाईपलाइनसाठी नागरिकांना काहीही त्रास दिला जात नाही. ते सरकारचं काम आहे. पण तुमच्या घरात पाणी कनेक्शन पाहिजे असेल तर त्याचं शुल्क तरी तुम्हाला द्यावं लागेल. तुम्ही सगळंच फुकट मागितलं तर ब्रह्मदेव वरून खाली आला, तरी पुरायचं नाही,” अजित पवारांनी अशी मिश्किल टिप्पणी करताच एकच हशा पिकला.

हेही वाचा- राज ठाकरे आणि बृजभूषण सिंह यांच्यातील वाद मिटला? मनसे नेत्याचं सूचक विधान

अजित पवार पुढे म्हणाले, “ज्याची ऐपत आहे, त्याच्याकडून आम्ही शुल्क घेतो. पण जो गरीब आहे, त्याच्यासाठी पंतप्रधान आवास योजनेसह इतरही अनेक योजना आहेत. मागासवर्गीय, आदिवासी, ओबीसी आणि अल्पसंख्याक आणि इतर घटकांसाठीही काही योजना आहेत. हे सगळं होत असताना, तुम्हाला घरबसल्या कॉक फिरवला की पाणी हवं असेल तर किमान २ हजार ६०० रुपये तरी द्यायला पाहिजे. उद्या तुम्ही म्हणाल आमच्या तोंडात पाणी ओतून द्या… असं नसतं रे बाबांनो…! शेवटी सरकार म्हणजे तुम्ही निवडून दिलेले आमदार-खासदार असतात. जिथे तुमच्यावर अन्याय होत असेल तिथे जरूर सांगा,” असंही अजित पवार यावेळी म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp leader ajit pawar statement on water supply connection and fee in ahmednagar rmm