पुणे : बारामतीमधून निवडणूक न लढविण्याचे संकेत देणारे उपमुख्यमंत्री अजित पवार शिरूरमधून लढण्याची शक्यता आहे. हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. तेथे अजित पवार विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे विद्यमान आमदार अशोक पवार अशी लढत होण्याची शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अजित पवार यांनी बारामती विधानसभेची जागा न लढण्याचे संकेत गुरुवारच्या मेळाव्यात दिले होते. त्यानंतर दादा कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढविणार, याची कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे. आता शिरूर मतदारसंघातून निवडणूक लढविण्याच्या दृष्टीने चाचपणी सुरू केल्याची माहिती पक्षातील सूत्रांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि आमदार अशोक पवार यांनी शरद पवार यांच्या समवेत राहण्याचा निर्णय घेतला होता. लोकसभा निवडणुकीपूर्वी शिरूरमध्ये झालेल्या मेळाव्यात अजित पवार यांनी विद्यामान खासदार आणि आमदारांना आव्हान दिले होते. ‘मंत्रिपद तर लांबच, आमदारच कसे होतो ते मी पाहतोच,’ असा इशारा अजित पवार यांनी अशोक पवार यांना दिला होता. या पार्श्वभूमीवर अजित पवार शिरूरमधून रिंगणात उतरल्यास अशोक पवार यांच्यापुढे मोठे आव्हान उभे राहील.

हेही वाचा : ‘जागा लुटीं’चे नगर जिल्ह्यात दीड वर्षात २७ गुन्हे; २१३ आरोपी

दरम्यान, अजित पवार केवळ बारामती किंवा शिरूरमधूनच नव्हे, तर राज्यातील कोणत्याही मतदारसंघातून विजयी होऊ शकतात अशी प्रतिक्रिया पक्षाचे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी दिली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp leader ajit pawar to contest assembly election 2024 from shirur assembly constituency css