बैलगाडा शर्यतीसाठी बैल जुंपायचे म्हणजे धाडस लागतं. बलदंड बैलांना आवरून त्यांना गाड्याला जुंपणं हे कोणालाही जमत नाही. मात्र जुन्नर तालुक्यातील दिक्षा विकास पारवे या मुलीने घाटात बैलगाडा जुंपला आहे. दिक्षाच्या या धाडसाचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून खासदार अमोल कोल्हेंनी तिचे कौतुक केले आहे. त्यांनी या मुलीला थेट फोन कॉल केला आहे. याआधी या मुलीचा बैलगाडा जुंपतानाचा व्हिडीओ कोल्हे यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला होता.
फोन करुन केले मुलीचे कौतुक
अमोल कोल्हे यांनी बैलगाडा जुंपणाऱ्या दिक्षा विकास पारवे या मुलीला फोन कॉल करुन तिचे कौतुक केले आहे. तसेच बैलगाडा शर्यतीमध्ये नियमांचेही पालन करण्याची सूचना कोल्हे यांनी केलीय. तुझा व्हिडीओ पाहिला. खूप छान वाटलं. बैलाचं नाव काय आहे ? हा बैल तुझ्याकडे कधीपासून आहे ? तू कधीपासून करतेस हे ? असे अनेक प्रश्न कोल्हे यांनी दिक्षाला विचारले. तसेच फार हिमतीने तू हे केलंस. फार अभिमान वाटला मला. पण हे सगळं करताना काळजी घे. सर्व नियमांचे पालन करा. स्वत:ची काळजी घ्या. त्यामुळे बैलगाडा शर्यत बंद होणार नाही. अभ्यासाकडेही दुर्लक्ष होऊ देऊ नको, असा सल्लादेखील कोल्हे यांनी मुलीला दिला.
अमोल कोल्हे म्हणाले शाब्बास गं रणरागिणी !
या आधी अमोल कोल्हे यांनी बैलगाडा जुंपणाऱ्या दिक्षाचा व्हिडीओ समाजमाध्यमावर अपलोड करुन तिला रणरागिणी म्हटलं होतं. “शाब्बास गं रणरागिणी! शिवजन्मभूमीच्या मातीतील शेतकऱ्याच्या लेकीही मागे नाहीत. जी मायेनं बैलपोळ्याला पुरणपोळी खाऊ घालते ती घाटात गाडा जुंपण्याची हिंमतही दाखवते. आपल्या जुन्नर तालुक्याची कन्या कु. दिक्षा विकास पारवे हिने बैलगाडा जुंपण्याची हिंमत दाखवली. दिक्षा तू महाराष्ट्रातील शूरवीर महिलांच्या परंपरेला साजेसं काम करून दाखवलंय. तुझ्या धाडसाचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे,” असं कोल्हे यांनी म्हटलं होतं.
दरम्यान, दिक्षा पारवे या बैलगाडा जुंपणाऱ्या मुलीनेही कोल्हे यांना शर्यतीदरम्यान सर्व नियमांचे पालन करण्याचे आश्वसन दिले.