महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. दिल्लीमध्ये फडणवीस, शिंदे यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली.  या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी खोचक ट्वीट केले आहे. ‘एकनाथ शिंदे भाजपाची उरली सुरली लोकप्रियता लवकरच संपवतील’, असा टोला मिटकरींनी भाजपाला लगावला आहे.

तर भाजपाची लोकप्रियता लवकरच संपेल

‘सद्यस्थिती महाराष्ट्रात मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्यामुळे श्री देवेंद्र फडणवीस दुसऱ्या, चंद्रकांत पाटील तिसऱ्या तर इतर भाजप नेते चौथ्या व पुढच्या नंबर वर फेकले गेलेत . विश्वास आहे शिंदे साहेब भाजपची जनमानसातील उरली सुरली लोकप्रियता लवकरच संपवतील’, असे ट्वीट अमोल मिटकरी यांनी केलं आहे.

एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर

मुख्यमंत्री पदी शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे पहिल्यांदाच दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. दिल्लीत शिंदे आणि फडणवीसांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली.अमित शाह, जेपी नड्डा यांच्यासोबत मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा केल्याचे सांगण्यात येत आहे. शिंदे-फडणवीस अॅटर्नी जनरल तुषार मेहतांनाही भेटणार आहेत. या भेटीत शिंदे गट आणि शिवसेना यांच्यात सुरु असलेल्या लढाईविषयी कायदेशीर बाबींवर चर्चा केली जाऊ शकते. महाराष्ट्र सरकारमध्ये भाजपाचा आणि शिंदे गटाचा किती वाटा असेल हे या दौऱ्यात ठरवले जाणार आहे. यावेळी शिंदे आणि फडणवीस यांनी रामनाथ कोविंद, नरेंद्र मोदी, जेपी नड्डा, राजनाथ सिंह, अमित शाह यांना विठ्ठल-रखुमाईंची मूर्ती भेट दिली.

शिवसेना आणि बंडखोर आमदार यांच्यातील लढाई कोर्टात दाखल

राज्यात शिंदे गट-भाजपा यांचे सरकार स्थापन झालेले असले, तरी शिवसेना आणि बंडखोर आमदार यांच्यातील लढाई कोर्टापर्यंत पोहोचली आहे. बंडखोर आमदारांवरील अपात्रतेची कारवाई, राज्यपालांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना सत्ता स्थापन करण्यासाठी दिलेले आमंत्रण, शिंदे-फडणवीस सरकारचा विश्वासदर्शक ठराव याबाबत ११ जुलैनंतर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.