औरंगाबाद नामांतराच्या वादानंतर आता अहमदनगरच्या नामांतराची मागणी पुढे आली आहे. अहमदनगरचं नाव अहिल्यानगर करा, अशी मागणी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलीय. पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून नामांतर करण्याचं आवाहन केलं आहे. पडळकर यांनी पत्रातून शरद पवार यांच्यावरही टीकास्त्र डागलं आहे. दुसरीकडे या पत्रानंतर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी नाव न घेता पडळकरांवर पलटवार केला आहे.

हेही वाचा >>> “…आपण काकांच्या रिमोट कंट्रोलवर चालत नाही हे दाखवून द्या, स्वाभिमानी मुख्यमंत्री आहात हे सिद्ध करा”

“विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना खूष करण्यासाठी काही लोकांनी सामाजिक राजकारण बिघडविण्याची सुपारी घेतली आहे. त्यातील एका सुपारीबहाद्दराने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहलं आहे. तसेच शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली आहे. पुण्यश्लोक अहिल्यामाई होळकर यांच्या जयंतीचं सोईने राजकारण करण्याचा प्रयत्न केला आहे. मला त्यांना हेच सांगायचं आहे की, देवेंद्र फडणवीस यांना खुश करण्यासाठी हे पाप करु नका,” असा पलटवार मिटकरी यांनी केला आहे.

हेही वाचा >>> राज्यात करोनाचे निर्बंध पुन्हा लागू? मुख्यमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक

तसेच, “पुण्यश्लोक अहिल्यामाई या जगाचे दैवत आहेत. त्यांच्या जयंतीचं सोईचं राजकारण करुन बहुजन समाजामध्ये फूट पाडण्याचं काम करु नका. या पत्रामागे फडणवीस यांची चाल आहे. फडणवीस यांच्या इशाऱ्यानेच हे पत्र पाठवण्यात आलं आहे,” असा आरोप मिटकरी यांनी केला.

हेही वाचा >>> काँग्रेसच्या ‘एक व्यक्ती एक पद’ ठरावाची अंमलबजावणी, आमदार विकास ठाकरे यांनी दिला शहराध्यक्ष पदाचा राजीनामा

तसेच पुढे बोलताना नामांतरापेक्षा विरोधकांनी महागाई, केंद्र सरकारची चुकीची धोरणे यावर बोलावं असं आव्हान मिटकरी यांनी पडळकरांना केलं आहे. “नामांतरणाचा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. औरंगाबाद नामांतराचा प्रश्न प्रलंबित आहे. यांचं म्हणणं आहे की नगरचं नामांतर करा. पण आमचं म्हणण आहे की केंद्र सरकारचे चुकीचे धोरण, वाढलेली महागाई यावर बोलावं. अहिल्यामाई यांना उत्तम प्रशासक म्हणून पाहिलं जातं. त्यांनी महागाई रोखण्याचं काम करायचं. मात्र केंद्र सरकारच्या पापांना झाकून ठेवायचं आणि महाराष्ट्र सरकारला तेवढं वेठीस धरायचं हे अत्यंत चुकीचं आहे. अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्या या नेत्याच्या पत्राला कवडीचीही किंमत नाही. अहिल्यामाई आमच्या सर्वांच्या मनात आहेत,” असे मिटकरी म्हणाले.

हेही वाचा >>> “अजित पवारांचा फायनान्स विषय कच्चा, बुद्धीमान माणसा…”; निलेश राणेंचा उपमुख्यमंत्र्यांना टोला

पडळकर यांनी काय मागणी केली?

“नुकत्याच पार पडलेल्या चौंडी, अहमदनगर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीमध्ये पवार आजोबा-पुतण्याच्या मुघलशाहीने पोलीस बळाचा गैरवापर करत अहिल्यादेवी भक्तांना चौंडी येथे दर्शनापासून जाण्यास रोखलं. शेकडो हिंदूंनी जीव गमावलेल्या मुंबई बॅामब्लास्टचा सुत्रधार दाऊद इब्राहीमच्या बहिणीसोबत आर्थिक भागीदार असलेल्या नवाब मलिक यांचे पालनकर्ते शरदचंद्र पवार यांना हिंदू राजमाता यांची जयंती म्हणजे नातवाला लॅान्च करण्याचा इव्हेंट वाटतो,” अशी घणाघाती टीका पडळकरांनी केली आहे.

हेही वाचा >>> लवकरच राज्यात मास्कसक्ती? अजित पवार म्हणाले,”…तेव्हा आम्ही लगेच मास्क बंधनकारक करु”

तसेच पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवलं आहे. ‘राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा जन्म झाला, त्या जिल्ह्याचे ‘अहमदनगर’ हे नाव बदलून ‘अहिल्यानगर’ करण्यात यावे अशी तमाम अहिल्याप्रेमींची लोकभावना आहे,’ असं पडळकरांनी या पत्रात म्हटलं आहे.