मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंत्री संदीपान भुमरे यांच्या मतदारसंघात आज (१२) जाहीर सभा होणार आहे. ही सभा यशस्वी ठरावी म्हणून भुमरे यांच्याकडून मागील अनेक दिवसांपासून तयारी केली जात आहे. मात्र या सभेला गर्दी व्हावी म्हणून लोकांना पैसे दिले जात आहेत, असा दावा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे तसेच शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. याच प्रकरणावर आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. भुमरे यांच्या मागील सभेला ११० लोक होती. यावेळच्या सभेलातरी गर्दी व्हावी म्हणून रोजंदारीवर लोक आणली जात आहेत, अशी टीका मिटकरी यांनी केली आहे. ते ‘टीव्ही ९ मराठी’ या वृत्तवाहिनीशी बोलत होते.
हेही वाचा >>> “दिल्लीतील शहंशाह हीच खरी…”, भाजपाचा शरद पवारांना टोला; म्हणाले, “राज्यात महाराजांच्या नावाने…”
“संदीपान भुमरे यांच्या मतदरासंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा होत आहे. सभेला गर्दी व्हावी म्हणून लोकांना २५० रुपये रोजंदारीप्रमाणे पैसे दिले जात आहेत, असा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. भुमरे यांच्या मागील सभेला केवळ ११० लोक हजर होती. यावेळी फ्लॉप शो होऊ नये म्हणून लोकांना पैसे दिले असावेत,” अशी टिप्पाणी आमदार अमोल मिटकरी यांनी केली. तसेच मुख्यमंत्र्यांच्या सभेला पैसे देऊन लोक आणावे लागत असतील, तर शिंदे गटाचे पुढील भविष्य चांगले नाही, असा टोलाही अमोल मिटकरी लगावला.
दरम्यान, शिंदे यांच्या पैठणमधील सभेत गर्दी जमवण्यासाठी लोकांना पैसे दिल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनीदेखील शिंदे गट आणि संदीपान भुमरे यांना लक्ष्य केलंय. “एकनाथ शिंदे तात्पुरते मुख्यमंत्री आहेत. ते पैठणला येत आहेत. मागील वेळी शिंदे आले तेव्हा केवळ २५ खुर्च्या होत्या. त्यामुळे बरीच बदनामी झाली असेल. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी हे काय लावलं आहे असं म्हटलं असेल. म्हणून आता त्यांना खूश करण्यासाठी यावेळी तेथील बंडखोर आमदार आणि मंत्री संदीपान भुमरे यांनी मोठ्या सभेची घोषणा केली. त्या सभेसाठी गर्दी करण्यासाठी अंबड, घनसावळी, पाथर्डी आणि संभाजीनगरच्या बाहेरील तालुक्यांमधून फोन आले.” असे चंद्रकांत खैरे म्हणाले.