महाराष्ट्रात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार स्थापन होऊन एक महिना उलटला आहे. पण अद्याप या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. या प्रार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी सूचक विधान केलं आहे. गेल्यावेळी देवेंद्र फडणवीस सरकारमधील मंत्र्यांना यावेळी मंत्रीपद देऊ नये, असं अमित शाह किंवा केंद्रातील भाजपाच्या हायकमांडचं म्हणणं आहे, असं विधान अमोल मिटकरी यांनी केलं आहे.
त्यामुळे मंत्रीमंडळ विस्तारावरून देवेंद्र फडणवीस यांचे भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत मतभेद असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मंत्रीमंडळ विस्ताराबाबत बोलताना अमोल मिटकरींनी एका वृत्तवाहिनीला सांगितलं की, “अशीही माहिती समोर येत आहे की, अमित शाह किंवा केंद्रातील भाजपाच्या हायकमांडचं असं म्हणणं आहे की, मागच्या काळात देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात जे लोकं मंत्री म्हणून काम पाहत होते, त्या लोकांची यावेळी पुनरावृत्ती नसावी. त्यामुळे बंडखोर आमदार आणि देवेंद्र फडणवीस सरकारमधील माजी मंत्र्यांमध्ये रस्सीखेच होण्याची शक्यता आहे.”
पुढे त्यांनी सांगितलं की, “दुसरा मुद्दा म्हणजे खंडपीठासमोरील निकाल वेगळा येण्याची शक्यता आहे. न्यायालयाचा निकाल शिवसेनेच्याच बाजुला लागेल असं दिसतंय.शिवाय शिवसेनेला जनतेचादेखील प्रतिसाद वाढतोय. त्यामुळे अलीकडच्या काळात ज्या काही घडामोडी घडल्या आहेत, याचा अर्थ स्पष्ट आहे की, आगामी काळात राज्यात महाभारत पाहायला मिळेल. शिंदे-फडणवीस सरकार औट घटकेचं आहे, ते औट घटकेचंच राहणार” असं भाकीत मिटकरी यांनी केलं आहे.