मुंबई आणि महाराष्ट्रात रविवारी हिंदू जन आक्रोश मोर्चाचे ठिकाठिकाणी आयोजन करण्यात आले होते. भाजपाचे अनेक नेते या मोर्चात पुढे दिसले. मुंबईमधील मोर्चाला तेलंगणा राज्यातील भाजपाचे आमदार टी. राजा यांनी उपस्थिती दर्शविली होती. यावेळी त्यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याबाबत बोलत असताना अतिशय खालच्या पातळीची टीका केली. या टीकेला आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उत्तर देण्यात येत आहे. “तेलंगणामधील भाजपाचा आमदार टी. राजा याने छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासात नाक खुपसण्याचे काम केले आहे. हा कसला टी राजा हा तर कपटी राजा.”, अशा शब्दात राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी टी. राजा यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.
तो दिवस धर्मवीर दिन म्हणून घोषित करा
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनात छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नसून स्वराज्य रक्षक होते, असे वक्तव्य केले होते. त्यानंतर भाजपाकडून राज्यभर त्यांच्याविरोधात आंदोलनही करण्यात आले होते. मात्र काल काढलेल्या हिंदू जन आक्रोश मोर्चामध्ये आमदार टी राजा यांनी अजित पवार यांचे नाव न घेता खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. त्यामुळे राष्ट्रवादीकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. टी राजा म्हणाले, “काही नेते असे म्हणत आहेत की, संभाजी महाराजांनी स्वराज्याची लढाई लढली धर्माची नाही. त्या नेत्यांना मी सांगू इच्छितो की, एकदा जर तुम्ही संभाजी महाराजांचा इतिहास वाचला असता तर अशा शब्दाचा प्रयोग तुम्ही केला नसता. आज मी केंद्र आणि राज्य सरकारला निवेदन करु इच्छितो की गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी छत्रपती संभाजी महाराज यांची हत्या करण्यात आली होती. त्यामुळे गुढीपाडव्याचा आधीचा दिवस धर्मवीर दिन म्हणून घोषित करा.”
बेगानी शादी मे अब्दुला दिवाना, अशी भाजपाची अवस्था
अमोल मिटकरी पुढे म्हणाले, “जेव्हा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला. त्यावेळी टी राजांचे हिंदुत्व कुठे गेले होते. दुसऱ्याला पुरुषार्थ शिकवणाऱ्यामध्ये किती पुरुषार्थ आहे. तेलंगणा मधून आलेला हा आमदार भाजपाने सोडलेलं पिल्लू आहे. तेलंगणाचा आमदार या महाराष्ट्रात येतो आणि महामानवांच्या विरोधात बोलतो. त्यामुळे यापुढे महाराष्ट्रात अशी वृत्ती वाढू देऊ नये. आज राज्यामध्ये त्यांचे सरकार असताना मोर्चा काढण्यात येत आहे. म्हणजे “बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना”, अशी गत सध्या भाजपची झाली आहे.”
बाहेरील राज्यातील लोक महाराष्ट्रात येऊन इथले राजकारण खराब करुन जातीय भेद निर्माण करत असतील तर अशा प्रवृतीला भर चौकात फटके दिले पाहिजे. या कपटी राजाला त्यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल भर चौकात नागवं करून फटके मारायला पाहिजे, असा टोला राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी लगावला आहे.