केंद्र सरकारने अलीकडेच भारतीय सैन्य भरतीसाठी अग्निपथ योजनेची घोषणा केली आहे. या योजनेनुसार ४ वर्षांसाठी कंत्राटी पद्धतीने सैन्य भरती केली जाणार आहे. केंद्र सरकारने या योजनेची घोषणा केल्यानंतर देशभर याचे पडसाद उमटत असून अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार वेगळ्या विचाराचं सैन्य निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना आव्हाड म्हणाले की, सध्या भारताच्या चारही बाजूला शत्रू राष्ट्र आहेत. अशा परिस्थितीत भारतीय सैन्य कंत्राटी कामगारांच्या ताब्यात देणं कितपत योग्य आहे. भारतीय सैन्याला देदीप्यमान इतिहास आहे. अग्निपथ योजनेतून २२ व्या वर्षीय नोकरीला लागलेला तरुण २६ व्या वर्षी निवृत्त होणार आहे. निवृत्त झाल्यानंतर तो करणार काय? असा सवालही त्यांनी विचारला.
पुढे बोलताना आव्हाड म्हणाले की, “यातील अतिशय धोकादायक गोष्ट म्हणजे तरुणांना हातात शस्त्रं मिळणार आहेत. ते शस्त्र चालवण्यात प्राविण्य मिळवतील, हा समाजापुढे मोठा धोका असेन. यातून केंद्र सरकार अशी एक पर्यायी व्यवस्था तयार करत आहेत, ज्याचा वापर त्यांना त्यांच्या विरोधकांपुढेही करता येईन, हा यातील सर्वात मोठा धोका असल्याचं त्यांनी म्हटलं.
हेही वाचा- “…हा राष्ट्रीय सुरक्षा दलाचा अपमान”, अग्निपथ योजनेवरून संजय राऊतांचं केंद्र सरकारवर टीकास्त्र
“जो भारतीय सैन्यात जातो, तो कधीही धर्म-जात-पंथ मानत नाही. तो या देशाशी इमान राखतो. ही माती त्याला आई वाटायला लागते. या आईला सुरक्षित ठेवायला पाहिजे, या एकाच उद्देशाने तो लढतो, छातीवर गोळ्या घेतो. पण कंत्राटी सैन्य छातीवर गोळ्या घेणार आहेत का? असा सवालही त्यांनी यावेळी विचारला.
केंद्र सरकारवर टीका करताना ते पुढे म्हणाले की, “तुम्ही नोकऱ्या देऊ शकत नाही, ठीक आहे. त्यावर उपाय योजना करता येतील. पण मी नोकऱ्या देतोय, हे दाखवण्यासाठी तुम्ही त्यांना सैन्यात ढकलाचं आणि असं सैन्य तयार करून ठेवायचं. जे एका वेगळ्या विचारापुढे देशातील लोकशाही उद्धवस्त करत देशाला फॅसिझमकडे घेऊन जातील, अशी परिस्थिती या सैन्यांमुळे निर्माण होईन. त्यामुळे लोकांनीही विचार करायला हवा की, सैन्यात कोण हवं आणि देशाची सुरक्षा करण्यासाठी काय करायला हवं,” असंही ते म्हणाले.