भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्या बीड येथील साखर कारखान्याला जीएसटी आयुक्तलयाने नोटीस बजावली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. पंकजा मुंडे या भाजपाच्या नेत्या आहेत आणि तरीही त्यांच्या साखर कारखान्याला नोटीस बजावण्यात आली आहे याचं आश्चर्य व्यक्त होतं आहे. तसंच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही यावर भलमोठी एक्स पोस्ट (ट्विटर) पंकजा मुंडे या भाजपाची लेक नाहीत का? असा प्रश्न विचारला आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे बडे नेते आणि महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पंकजा मुंडेंना एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे.
काय म्हटलं आहे अनिल देशमुख यांनी?
पंकजा मुंडे यांच्यावर त्यांचाच पक्ष अन्याय करतो आहे. भाजपाला मोठं करण्याचं काम गोपीनाथ मुंडे यांनी केलं. मात्र त्यांच्याच कन्येवर पक्ष अन्याय करतो आहे ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे. पंकजा मुंडे यांनी आता योग्य तो विचार करावा आणि योग्य निर्णय घ्यावा असा सल्ला अनिल देशमुख यांनी दिला आहे. पंकजा मुंडे यांच्याविषयी हे वक्तव्य करतानाच मला भाजपाने ऑफर दिली होती ईडीची कारवाई सुरु झाली त्याचवेळी ही ऑफर आली होती. मी जर समझोता केला असता तर मला काहीही झालं नसतं असंही म्हटलं आहे.
काय आहे हे प्रकरण?
भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या पांगरी (ता. परळी) येथील वैद्यनाथ सहकारी कारखान्याने १९ कोटी रुपयांचा कर बुडवल्याप्रकरणी तेवढ्याच रकमेची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. सहा महिन्यांपूर्वी टाकलेल्या छाप्यात हाती आलेल्या कागदपत्रांच्या आधारे केंद्रीय वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) छत्रपती संभाजीनगर येथील आयुक्तालयाने ही कारवाई केली.
आणखी काय म्हणाले अनिल देशमुख?
शिवसेना आमदार अपात्रतेच्या सुनावणीच्या मुद्द्यावरही अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमदार अपात्रतेचा मुद्दा साधा सरळ आहे तरीही तारीख पे तारीख दिली जात आहे. न्याय द्यायचा नसेल तर असा वेळकाढूपणा केला जातो असंही त्यांनी म्हटलं आहे. विधानसभा अध्यक्षांनी लाईव्ह सुनावणी घ्यावी ही विजय वडेट्टीवार यांनी केलेली मागणी योग्यच आहे असंही अनिल देशमुख म्हणाले.