राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री अनिल देशमुख नुकतेच तुरुंगातून बाहेर आले आहेत. आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांमुळे ते मागील अनेक दिवसांपासून तुरुंगात होते. दरम्यान, उच्च न्यायालायाने त्यांना जामीन देताना मुंबईबाहेर न जाण्याची अट घातली आहे. त्यांनी आज (१९ जानेवारी) मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालायाला भेट दिली. येथे त्यांनी मी लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे सांगितले. या भेटीत नेमकी कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
हेही वाचा>>> लोकार्पण सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेवर नाव नसल्याने अरविंद सावंतांचा संताप; दीपक केसरकर म्हणाले, “हा कार्यक्रम…”
मुंबईबाहेर जाण्यास परवानगी नाही, मग नागपुरात कधी जाणार?
अनिल देशमुख यांनी लवकरच नागपूरचा दौरा करणार असल्याचे सांगितले. “सध्या उच्च न्यायालयाने मला मुंबईबाहेर जाण्यास मनाई केलेली आहे. त्यामुळे या महिन्याच्या शेवटी कोर्टाची परवानगी घेऊन मी नागपूरमध्ये जाणार आहे. त्यावेळी मी विदर्भ तसेच माझ्या मतदारसंघाचा दौरा करणार आहे. कोर्टाची परवानगी घेऊन मी संपूर्ण महाराष्ट्रात तसेच विदर्भात पक्षाचे काम करेन,” अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली.
हेही वाचा>>> “भारताला न्यूझीलंडच्या पंतप्रधानांसारख्या नेत्याची गरज,” काँग्रेस नेते जयराम रमेश यांचे विधान!
एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांची घेणार भेट
“मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विकासकामांसदर्भात पत्र लिहिले होते. हे पत्र नागपूर, विदर्भातील समस्यांबाबत होते. आता मी स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीदेखील मी भेट घेणार आहे. भेट घेऊन विकासकामांना कशी गती देता येईल यासाठी मी चर्चा करणार आहे. विकासकामांबाबतच ही भेट असेल,” असे अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा>>> Twitter Layoffs :ट्विटरमध्ये आणखी कर्मचारीकपात? लवकरच निर्णयाची अंमलबजावणी होण्याची शक्यता
पाचही जागांवर आमचाच विजय होणार
शेवटी बोलताना त्यांनी विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीवरही भाष्य केले. “महाविकास आघाडीतील सर्व ज्येष्ठ मंडळी नाशिक तसेच नागपूरमधील पेच सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. या दोन्ही जागांसह अन्य जागांवरही आमचेच उमेदवार निवडून येतील,” असा विश्वास अनिल देशमुख यांनी व्यक्त केला.