Baba Siddique Shot Dead Update News : संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या बाबा सिद्दीकी यांच्या हत्याप्रकरणातील संशयित आरोपी शुभम लोणकर हा अद्यापही फरार आहे. त्याचा भाऊ प्रवीण लोणकर राहत्या घरातून अटक केली असली तरीही शुभम लोणकर, शिवा गौतम आणि मोहम्मद झिशान अख्तर या तिघांच्या शोधासाठी मुंबई पोलिसांनी १५ पथके तैनात करण्यात आली आहेत. दरम्यान, शुभम लोणकरसाठी लुक आऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. एएनआयने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
गोळीबार करणाऱ्यांपैकी धर्मराज कश्यप, गुरमेल सिंह या दोघांना घटनास्थळावरून अटक करण्यात आली होती. तसेच त्यांना मदत करणाऱ्या प्रवीण लोणकर याला गुन्हे शाखेने पुण्यातून अटक केली होती. याप्रकरणी गोळीबार करणारा शिव कुमार ऊर्फ शिवा गौतम याच्यासह आरोपींना मदत करणारा मोहम्मद झिशान अख्तर व कटात सहभागी शुभम लोणकर यांचा शोध सुरू असून त्यांना पकडण्यासाठी मुंबई पोलिसांनी १५ पथके तैनात केली आहेत.
शुभम लोणकर कोण?
१२ ऑक्टोबर रोजी शनिवारी रात्री झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर या हत्येची जबाबदारी स्वीकारणारी एक फेसबुक पोस्ट शुबू लोणकर महाराष्ट्र या फेसबूक पेजवरून शेयर करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात होता. शुबू हा अकोला जिल्ह्याच्या अकोट येथील शुभम रामेश्वर लोणकर आहे, अशी माहिती पुढे आली होती. या दृष्टीने पोलीस तपास करत होते.
NCP leader Baba Siddique's murder case: Mumbai Police issued a Look Out Circular (LOC) against Shubham Lonkar, an absconding accused in the case. Police are continuously searching for the accused: Mumbai Police
— ANI (@ANI) October 17, 2024
या तपासादरम्यान पोलिसांनी त्याच्या अकोट येथील घरी दाखल झाले. मात्र, घराला कुलूप होतं. शेजाऱ्यांकडे विचारपूस केली असता, दोघेही भाऊ पुण्यात राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या पुण्यातील घरी छापा टाकला. त्यावेळी शुभम लोणकर हा फरार असल्याचे त्यांच्या लक्षात आलं. तसेच पोलिसांनी त्याचा भाऊ प्रवीण लोणकरला अटक केली. हे दोघेही बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा कटात सहभागी होते. पोलीस आता शुभम लोणकर याचा शोध घेत आहेत. तसंच, मोहम्मद झिशान अख्तर हादेखील हल्ल्याच्या दिवशी मुंबईत नव्हता. पण तो मोबाईलद्वारे आरोपींच्या संपर्कात होता, अशी माहिती आरोपींनी चौकशीत दिली आहे.
‘लूकआउट नोटीस’ किंवा ‘लूकआउट सर्कुलर’ म्हणजे काय?
तपास यंत्रणांकडून दिल्या जाणारी ही नोटीस फरार व्यक्तींसंदर्भात वापरली जाते. वॉण्टेड म्हणजेच पोलीस ज्या व्यक्तीचा माग घेत आहे अशी व्यक्ती परदेशात कुठे प्रवास करते यासंदर्भातील माहिती मिळवण्यासाठी ही नोटीस जारी केली जाते. याचा वापर आंतरराष्ट्रीय सीमांवर इमिग्रेशनच्या तपासणीसंदर्भात करता येतो. या नोटीसच्या माध्यमातून फरार असणारी व्यक्ती परदेशात जाणार नाही यासंदर्भातील सतर्कता तपास यंत्रणा किंवा पोलीस घेतात.