Chhagan Bhujbal NCP Party: लोकसभेचं तिकिट नाकारल्याने आणि राज्यसभेवरही न पाठवल्याने अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले दिग्गज नेते छगन भुजबळ हे नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या. त्यांच्या काही निकटवर्तीयांनी छगन भुजबळ हे लवकरच वेगळा विचार करु शकतात असं म्हटलं आहे. छगन भुजबळ हे गेल्या वर्षभरापासून महायुतीच्या विरोधात भूमिका घेत आहेत, त्यांनी मागच्या वर्षी मंत्रिपदाचाही राजीनामा दिला होता. आता लोकसभा निवडणुकीत संधी न मिळाल्याने आणि त्यापाठोपाठ सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर पाठवण्यात आल्याने छगन भुजबळ नाराज झाल्याच्या चर्चा सुरु झाल्या. त्यावर दस्तुरखुद्द छगन भुजबळांनी उत्तर दिलं आहे.
हे पण वाचा- “छगन भुजबळांच्या भूमिका गोंधळलेल्या”, संजय शिरसाटांचं मोठं विधान; म्हणाले, “ते आजकाल उबाठा गटाची…”
छगन भुजबळांच्या नाराजीची चर्चा का सुरु झाली?
छगन भुजबळ यांच्या निकटवर्तीयांचं हे म्हणणं आहे की नाशिकमधून लोकभेचं तिकिट नाकारल्याने छगन भुजबळ नाराज होतेच. मात्र आपल्याला राज्यसभेवर पाठवलं जाईल अशी अपेक्षा त्यांना होती. ती त्यांनी बोलूनही दाखवली होती. पण सर्वानुमते सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय झाला. त्यानंतर छगन भुजबळ यांची नाराजी आणखी वाढली आहे. समता परिषदेची बैठक सोमवारी पार पडली त्या बैठकीतही छगन भुजबळ यांनी वेगळा निर्णय घ्यावा असा सल्ला त्यांच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे असं समजतं आहे.
छगन भुजबळ यांचं स्पष्टीकरण काय?
“मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहे. माझ्या विषयी ज्या विविध चर्चा केल्या जात आहेत त्यामध्ये तथ्य़ नाही. मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे आणि कायमच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहणार आहे. मी नाराज आहे, दुसऱ्या नेत्यांना भेटलो आहे. विरोधी पक्षातल्या नेत्यांची भेट घेतली या सगळ्या बातम्यांमध्ये तथ्य नाही. तसंच माझ्या नाराजीच्या चर्चा साफ खोट्या आहेत.” असं छगन भुजबळ म्हणाले.
हे पण वाचा- जितेंद्र आव्हाडांचा आरोप, “भाजपाकडून अजित पवारांना बळीचा बकरा..”
भुजबळांनी सगळा घटनाक्रमही सांगितला
१० जून : मी षण्मुखानंद हॉल येथील कार्यक्रमात होतो.
११ जून: आमच्या लोकांबरोबर मी होतो
१२ जून : अजित पवार यांच्या निवासस्थानी बैठक बोलवण्यात आली होती, त्या बैठकीत उपस्थित होतो.
१३ जून: राज्यसभेसाठी अर्ज भरायला गेलो होतो.
१४ जून : पुण्यात गेलो होतो, तिथे काही बैठका घेतल्या
१५ जून : येवल्यात कार्यकर्त्यांसह होतो
१६ जून : मुंबईत होतो.
मला जर कुणाला भेटायचं असेल तर मी उघडपणे भेटेन, असंही भुजबळ यांनी म्हटलं आहे. एबीपी माझाला दिलेल्या प्रतिक्रियेत त्यांनी हे सविस्तर उत्तर दिलं आहे.
भुजबळांच्या या वक्तव्याने लक्ष वेधलं
छगन भुजबळ म्हणाले “मी दादांसह नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहे. याचा नेमका अर्थ काय? याची चर्चा आता रंगली आहे. मी नाराज नाही. राजकारणात नाराज होऊन चालत नाही. राजकारणात प्रत्येकजणच नाराज होतो आणि दुसऱ्या दिवशी कामाला लागतो. कमी जागा आल्याने राहुल गांधी नाराज असतील, एवढंच कशाला मोदीही नाराज असतील. शरद पवार नाराज असतील, देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे पण नाराज असतील. पण ते सगळे दुसऱ्या दिवशी कामाला लागले. त्याप्रमाणेच मी देखील कामाला लागलो आहे.” असंही भुजबळ यांनी स्पष्ट केलं.