“झुंडशाहीसमोर नमते घेऊन मागच्या दाराने लाखो लोकांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचे काम सुरू आहे. सगेसोयरे वैगरे मागण्यामुळे भटके-विमुक्त, वंचित ओबीसींच्या आरक्षणावर घाला घातला जात आहे. अशा परिस्थितीत आमच्याकडे दुसरा पर्याय उरला नाही. त्यामुळे आमदार-खासदारांसमोर आमची कैफियत मांडणे, न्यायालयाचे दरवाजे ठोठावणे, लोकांमध्ये जनजागृती करणे, आक्रोश व्यक्त करणे, असे मार्ग आमच्यासमोर उरले आहेत”, अशी खंत छगन भुजबळ यांनी आज माध्यमांसमोर मांडली. तसेच मनोज जरांगे पाटील यांनाही थेट इशारा दिला. जरांगे पाटील यांच्या मुंबईतील सभेतील गावागावत उन्मादी वातावरण निर्माण झाले असून परिस्थिती चिघळली असल्याबद्दल भुजबळ यांनी चिंता व्यक्त केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“…तर मंडल आयोगाला आव्हान देऊ”, ओबीसी नेत्यांच्या बैठकीनंतर जरांगेंनी सांगितली मराठा आंदोलनाची पुढची दिशा

मनोज जरांगे पाटील यांनी थेट मंडल आयोगालाच आव्हान दिले होते. यावर टीका करताना छगन भुजबळ यांनी जरांगे पाटील यांना इशारा दिला. मनोज जरांगे पाटील यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी मंडल आयोगाला आव्हान देऊन दाखवावे, असे विधान छगन भुजबळ यांनी केले आहे. “जरांगे पाटील यांच्याएवढा ज्ञानी देशात दुसरा नाही. ते तीन कोटी मराठा बांधव मुंबईत आणणार होते. पण नवी मुंबईत सर्वांनीच पाहिले किती लोक होते ते. मंडल आयोगाला त्यांना विरोध करायचा असेल तर त्यांनी जरूर करावा आणि मंडल आयोगाला संपविण्याचे काम करून दाखवावे”, असे प्रतिआव्हान जरांगे पाटील यांना दिले.

मी एका जातीसाठी नाही तर ओबीसी प्रवर्गासाठी लढत आहे. या प्रवर्गात साडे चारशे जाती आहेत. जरांगे पाटील केवळ एका जातीसाठी लढत आहेत, असंही छगन भुजबळ म्हणाले. मराठा समाजाला मागच्या दाराने आरक्षण प्रवेश दिला जात असल्याबाबत छगन भुजबळ यांनी आक्षेप व्यक्त केला. मंत्रिमंडळ बैठकीत मी याबद्दल आक्षेप घेतला, पण मंत्रिमंडळाची बैठक अजेंड्यावर चालत असते. त्या अजेंड्यावर हा विषय नव्हता, असेही भुजबळ यांनी स्पष्ट केला.

“मराठा समाजासाठी अध्यादेश काढलाच नाही, तो केवळ…”, छगन भुजबळांनी ठेवलं मुद्द्यावर बोट!

डीजेच्या दणदणाट मला शिव्या देतायत

छगन भुजबळ पुढे म्हणाले की, गावागावत सध्या उन्मादाचे वातवरण दिसत आहे. रात्रीच्या तीन-तीन वाजेपर्यंत डीजेचा दणदणाट सुरू आहे. जिथे ओबीसी वस्ती आहे, तिथे अधिक उन्माद करण्यात येत आहे. आम्ही मुंबईवरून आरक्षण घेऊन आलो आहोत, हा विजयी उन्माद साजरा केला जात आहे. डीजेवर मला शिवीगाळ करणारी गाणी वाजवली जात आहेत, अशी माहिती माझ्यापर्यंत आली आहे. राज्यात दुर्दैवाने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे, अशी खंतही भुजबळ यांनी व्यक्त केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp leader chhagan bhujbal challenge to manoj jaranage patil on mandal commission kvg