केंद्र सरकारने अग्निपथ योजनेची घोषणा केल्यापासून याचे देशभर पडसाद उमटत आहेत. हजारोंच्या संख्येनं तरुण एकत्र येत देशभरात आंदोलन करत आहेत. आंदोलनाचा हा वणवा आता वाढतच चालला असून अनेक ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. केंद्रातील सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडून अग्निपथ योजनेचं कौतुक होत असून अनेकजण पाठराखण करताना दिसत आहेत. तर विरोधी पक्षातील नेत्यांकडून जोरदार टीका केली जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी देखील अग्निपथ योजनेवरून केंद्र सरकारवर टीका केली आहे. अग्निपथ योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार तरुणांची टिंगलटवाळी करत असल्याची टीका त्यांनी केली आहे. “उमेदीचे चार वर्षे तरुणांनी तुमच्यासोबत काम करायचं. त्यानंतर तुम्ही त्यांना सांगणार, आता तुम्ही बाहेर व्हा. पण अशा तरुणांनी पुढे काय करायचं?” असा सवाल भुजबळांनी विचारला आहे.
“कुणाच्या डोक्यातून काय निघतंय, हे मला समजत नाही. वर्षाला दोन कोटी रोजगार देणार होते, ते सगळं राहिलं बाजूला, आता देशात अग्निपथ, अग्निशिखा सुरू आहे. अशा योजनांतून सरकार तरुणांची टिंगलटवाळी किंवा मस्करी करतंय की काय, असं वाटायला लागलं आहे. लोकांना कायमस्वरुपी नोकऱ्या हव्या आहेत. त्याप्रकारचे रोजगार वाढवण्याची गरज आहे. सैन्यात देखील याची गरज आहे. चार वर्षांनी घरीच जायचंय, असं डोक्यात असणारे सैनिक तयार कसे होतील?” असा सवालही त्यांनी यावेळी विचारला.