Chhagan Bhujbal On Mahayuti : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात अनेक ज्येष्ठ माजी मंत्र्यांना डावलण्यात आल्याची चर्चा सरकार स्थापन झाल्यापासून सुरु आहे. यावरून गेले अनेक दिवस महायुतीत नाराजी नाट्य सुरु असल्याचं बोललं जातं. भारतीय जनता पक्षाचे नेते सुधीर मुनगंटीवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते तथा माजी मंत्री छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेलं नाही. यावरून अनेकदा छगन भुजबळ यांनी नाराजी देखील व्यक्त केली होती. एवढंच नाही तर अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्यावरही टीका करत नाराजी व्यक्त केली होती. या बरोबरच मंत्रिमंडळातून डावलण्यात आल्यानंतर काही दिवसांपूर्वी छगन भुजबळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट देखील घेतली होती.
छगन भुजबळ आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं होतं. दरम्यान, आज (३ फेब्रुवारी) छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा महायुतीत जेष्ठ नेत्यांना डावललं जातंय का? यावर एका वाक्यात प्रतिक्रिया दिली आहे. ‘तसेच मला जे बोलायचं ते मी बोललो, आता परत तेच तेच बोलण्याची इच्छा नाही’, अशी सूचक प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
छगन भुजबळ काय म्हणाले?
महायुती सरकारकडून जेष्ठ नेत्यांना डावलण्याचं काम सुरु आहे का? सुधीर मुनगंटीवार असतील किंवा तुम्ही (छगन भुजबळ) आहात, तुम्हाला मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेलं नाही. याबाबत तुम्ही अनेकदा नाराजी देखील बोलून दाखवली. काय वाटतं? असा प्रश्न छगन भुजबळांना विचारला असता ते म्हणाले, “मग मी काय करू? असं आहे मला जे काही बोलायचं ते मी बोललेलो आहे. परत-परत तेच-तेच दळण दळण्याची माझी इच्छा नाही”, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळांनी दिली.
अजित पवारांची भेट घेणार का?
मंत्रिमंडळात सहभाग न मिळाल्याने छगन भुजबळ यांनी अजित पवारांबाबत नाराजी व्यक्त केली होती. तसेच पक्ष सोडण्याच्या संदर्भात एक सूचक विधान देखील त्यांनी केलं होतं. मात्र, त्यानंतर अजित पवारांनी त्यांच्याशी संपर्क केल्याचं बोललं जात होतं. दरम्यान, या संदर्भाने छगन भुजबळांना आज प्रश्न विचारण्यात आला, यावर बोलताना ते म्हणाले की, ‘अजित पवार जेव्हा बोलावतील तेव्हा त्यांची भेट घेऊ’, असं भुजबळांनी म्हटलं आहे.
नैतिकतेची नेमकं व्याख्या काय?
नैतिकतेची व्याख्या काय? यावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. विरोधी पक्षाकडून आज सभागृहात काही प्रश्न विचारण्यात आले आहेत, या संदर्भात छगन भुजबळ यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रश्न विचारला असता ते म्हणाले, “विरोधकांनी काही प्रश्न विचारले असतील तर त्यावर सरकार उत्तर देईल.”