महाराष्ट्रात सध्या प्रचंड वेगवान घडामोडी घडत आहेत. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्याने महाविकास आघाडी सरकार अडचणीत आलं आहे. कोणत्याही क्षणी महाविकास आघाडी सरकार अल्पमतात येऊ शकतो, असे तर्क लावण्यात येत आहेत. अशी एकंदरीत स्थिती असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी महाविकास आघाडी सरकारला अजिबात धोका नसल्याचं म्हटलं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात वादळ आलं असून ते शमल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
संबंधित प्रकरणाबाबत माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, “मला असं वाटतंय की हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे. काही वेळ लागेल पण हे वादळ निश्चितपणे शमल्याशिवाय राहणार नाही. महाविकास आघाडी सरकारला यामुळे अजिबात धोका नाही. जोपर्यंत पवारसाहेब, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस पक्ष मजबूत आहे, तोपर्यंत मविआ सरकारला कसलाही धोका नाही.”
पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “महाराष्ट्राच्या राजकारणात काहीतरी होणार, असं काही जणांना वाटत आहे. पण शिवसेना नेते सुरतला पोहोचले आहेत. ते नाराज उमेदवारांची समजूत घालतील. त्यानंतर शिवसैनिक पुन्हा शिवसेनेत परत येतील, असं मला वाटतंय.
एकनाथ शिंदे यांना गटनेते पदावरुन हटवल्याबाबत विचारलं असता, ते म्हणाले की, एकनाथ शिंदे सध्या महाराष्ट्राबाहेर आहेत. त्यामुळे सगळ्या आमदारांना सांभाळण्यासाठी एखाद्या गटनेत्याची नियुक्ती करावी लागते. जो इतर आमदारांशी संपर्क साधेल, त्यांना एकत्र बोलावून बैठका घेईल, त्यासाठी गटनेते म्हणून एखाद्या नेत्याची नियुक्ती करावी लागते. त्याप्रमाणे शिवसेनेनं अजय चौधरी यांची नियुक्ती केली.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सर्व आमदार संपर्कात आहेत. शिवसेनेचे आर्धे आमदार संपर्कात नाहीत, पण हळुहळू सर्वजण पुन्हा संपर्कात येतील. महाराष्ट्राच्या राजकारणात वादळ आलं आहे. ते काही वेळात शांत होईल, उद्यापर्यंत सर्व प्रकरण निवळेल, असंही ते म्हणाले.