कराड : राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट सत्तेत सामील झाला, हे खरे. पण, शरद पवारांपासून आम्ही दूर आहोत, असे वाटत नसल्याचे भावनिक प्रतिपादन राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी केले. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वपक्षीयांनी एकत्रित बसून तोडगा काढणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.
कराडमध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन केल्यानंतर माध्यमांशी ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांकडून निवडणूक आयोगाकडे स्वतंत्रपणे म्हणणे सादर झाले असल्याने ही आता कायदेशीर बाब असल्याचे सांगत यासंदर्भात अधिक बोलणे भुजबळ यांनी टाळले.
हेही वाचा >>> “होय, आमच्यावर दबाव होता”, भाजपाबरोबर सत्तेत सामील होण्याबाबत अजित पवारांचं मोठं वक्तव्य
शरद पवार त्या अर्थाने नेते
शरद पवार यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात मंडल आयोग लागू झाला. तो आयोग तत्कालिन पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांनी स्वीकारला. त्यामुळे ओबीसींना २७ टक्के आरक्षण मिळाले. शरद पवार यांनी ओबीसी समाजाला आरक्षण दिल्याने समाजाला न्याय मिळाला, ही गोष्ट विसरता येणार नाही. त्या अर्थाने शरद पवार नेते आहेत. आम्ही त्यांच्यापासून दुरावलेलो नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट सत्तेत सामील झाला आहे इतकंच असा निर्वाळा भुजबळ यांनी दिला.
सर्वपक्षीय नेत्यांची बैठक व्हावी
सध्या मराठा आरक्षणावरून निर्माण झालेले वातावरण चुकीचे आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वपक्षीय नेत्यांची एकत्रित बैठक होणे गरजेचे आहे. सर्वांच्या मतानुसार योग्य मार्गाने जायचे ठरले पाहिजे असे मत भुजबळ यांनी व्यक्त केले.
हेही वाचा >>> “यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांवर वाटचाल करणार”, अजित पवारांचं कराडमध्ये विधान
ओबीसीतून आरक्षण किती व्यवहार्य
ओबीसींमध्ये यापूर्वी अडीचशे जाती होत्या. त्यात हळूहळू वाढ होत पावणे चारशे जाती झाल्या आहेत. आयोगाच्या शिफारसीनंतर ओबीसीच्या जाती वाढत आहेत. ओबीसीतून मराठा आरक्षण देणे किती व्यवहार्य आहे, हे तपासण्याची गरज आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण या सर्व नेत्यांचे तेच मत असल्याकडे छगन भुजबळ यांनी या वेळी लक्ष वेधले.