मराठा आरक्षणाच्या अध्यादेशानंतर अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी त्याचा विरोध केला होता. या विरोधानंतर शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड आणि संजय शिरसाट यांनी छगन भुजबळ यांच्यावर टीका केली. संजय गायकवाड यांनी छगन भुजबळ यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, असे सांगितले. “त्यांच्या कमरेत लाथ घालून बाहेर काढा”, असेही विधान संजय गायकवाड यांनी भुजबळ यांच्याबद्दल केले होते. या विधानावर आता छगन भुजबळ यांनी प्रत्युत्तर दिले आहे. भुजबळ यांनी आपल्या शैलीत उत्तर देत असताना तेही जुने शिवसैनिक असून आनंद दिघे यांची सहकारी असल्याची आठवण करून दिली.
छगन भुजबळ आज सकाळी माध्यमांशी बोलताना म्हणाले की, माझा राजीनामा मागण्याचा अधिकार सर्वसामान्य माणसाला आहे. तसा तो आमदारांनाही आहेच. त्याबद्दल माझे काहीही म्हणणे नाही. पण संजय गायकवाड यांनी राजीनामा मागताना जी भाषा वापरली, ती बरोबर नाही. संजय गायकवाड शिवसेनेत आहेत. त्यामुळे मी त्यांना सांगू इच्छितो की, तुम्ही ज्या शिवसेनेच्या शैक्षणिक संस्थेत शिकत आहात. त्या संस्थेतील मी वरिष्ठ प्राध्यापक होतो. भाषा जरा जपून वापरायला पाहीजे. त्याबद्दल त्यांचे नेते एकनाथ शिंदे हे पाहतील.
‘छगन भुजबळ यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करा’, शिंदे गटाचे आमदार आक्रमक; सरकारमध्ये दोन गट
“कमरेत लाथ घालून मला बाहेर काढण्याची भाषा वापरली असली तरी मंत्रिमंडळातून बाहेर काढण्याचा किंवा ठेवण्याचा अधिकार सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा आहे. राहिला प्रश्न कमरेत लाथ घालण्याचा तर मला असं वाटतं की ते असं करणार नाहीत. कारण त्यांचे स्व. आनंद दिघे आणि त्यांचे सहकारी आमदार मो. दा. जोशी यांच्याबरोबर मी काम करत होतो. त्यामुळे त्यांनाही कल्पना आहे की, अशी लाथ घालणं किंवा अशाप्रकारची भाषा करणे, हे योग्य नाही”, असा सूचक इशाराही छगन भुजबळ यांनी दिला.
छगन भुजबळ पुढे म्हणाले की, संजय गायकवाड यांचे मी काय वाकडे केले, हेच मला कळत नाही. मी त्यांना कधी भेटलेलोही नाही. ते त्यांच्या समाजाची मागणी करत आहेत. मी माझ्या ओबीसी वर्गाची मागणी पुढे करत आहेत. यामध्ये त्यांनी वाईट वाटून घेण्याचे काही कारण नाही.
“भुजबळांबाबत भाजपाचं ठरलंय”, अंजली दमानियांचा मोठा दावा; राजकीय तर्क-वितर्कांना उधाण!
संजय गायकवाड काय म्हणाले होते?
शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी माध्यमांशी बोलत असताना छगन भुजबळ यांच्यावर आरोप केले होते. “छगन भुजबळ हे मराठा समाजाच्याविरोधात तिरस्काराची भावना ठेवून बोलत आहेत. हे योग्य नाही, अशा मंत्र्याला मंत्रिमंडळात ठेवता कामा नये, त्यांची हकालपट्टी करावी. मंत्रिपद घेताना सर्वांना समान न्याय देण्याची शपथ घेतली जाते, अशावेळी भुजबळ एका समाजाचा तिरस्कार कसा काय करू शकतात?”, असा प्रश्न संजय गायकवाड यांनी उपस्थित करत टीका केली.
जरांगे पाटील उपोषणाला बसण्याआधीच सरकारचा जीआर तयार
मनोज जरांगे पाटील १० फेब्रुवारी पासून पुन्हा उपोषणाला बसणार आहेत. मराठा आंदोलकांवरील गुन्हे सरसकट मागे घ्या, अशी त्यांची मागणी आहे. या प्रश्नावर बोलत असताना छगन भुजबळ म्हणाले की, जरांगे पाटील उपोषणाला बसण्याआधीच सरकारचे जीआर तयारच असतात. त्यामुळे त्यांच्या मागण्या मान्य होऊ शकतात. शिक्षण, शेती, पायाभूत सुविधा उभारण्यावर आणि महिलांच्या प्रश्नावर ते उपोषणाला बसू शकतात. काल तर त्यांनी अर्थसंकल्पातून मराठ्यांना आरक्षण द्या, अशी मागणीही केली. मला तर हा उपाय कधी सुचलाच नव्हता. पण त्यांना तो सुचला. मोठ मोठे मराठा नेते, मुख्यमंत्री, विचारवंत, वक्ते यांनाही हा विचार कधी सुचला नाही.