उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर शनिशिंगणापूरमध्ये शनी चौथऱ्यावर दर्शनासाठी गेलेल्या भूमाता ब्रिगेडच्या महिला आणि स्थानिक गावकऱ्यांमध्ये शनिवारी जोरदार संघर्ष झालेला दिसला. यावेळी गावकरी आणि मंदिर प्रशासनाने पोलिसांच्या साथीने भूमाता ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना अक्षरक्ष: हुसकावून लावले. या प्रकारामुळे प्रशासनाने न्यायालयाचा आदेशाचा अवमान केल्याचे दिसून आले. दरम्यान, या घटनेनंतर दर्शन घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, असा पवित्रा घेणाऱ्या तृप्ती देसाईंना पोलिसांनी ताब्यात घेऊन पुण्याच्या दिशेने रवाना केले.
आज दुपारच्या सुमारास तृप्ती देसाई आणि राष्ट्रवादीचे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या नेतृत्त्वाखाली आंदोलकांनी शनी चौथऱ्यावर प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेथील सुरक्षारक्षक आणि गावकऱ्यांनी या सगळ्यांना जोरदार धक्काबुकी करत मागे रेटले. यावेळी भानुदास मुरकुटे यांनाही मारहाण करण्यात आली.  सुरक्षारक्षक आणि गावकऱ्यांनी मुरकुटे यांचे कपडेही फाडले. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरूनच आपल्याला मारहाण केल्याचा आरोप मुरकुटे यांनी केला.
या सगळ्या प्रकारानंतर तृप्ती देसाई यांनी आम्ही काही झालेले तरी मागे हटणार नाही, असा पवित्रा घेतला होता. न्यायालयाचे आदेश असतानाही पोलिसांनी आम्हाला धक्काबुक्की करणाऱ्या गावकऱ्यांना मज्जाव केला नाही. हा न्यायालयाच्या आदेशाचा अवमान नाही का, असा सवाल करत तृप्ती देसाई यांनी पोलिस आणि गृहमंत्रीपदाचा कारभार सांभाळणाऱ्या देवेंद्र फडणवीसांवर गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला. न्यायालयाने आदेश दिल्यानंतरही महिलांना अशाप्रकारे रोखणे हे चुकीचे आहे. गावकऱ्यांसोबतच आम्हाला पोलीस आणि मंदिर प्रशासनाने रोखले. न्यायालयाने आदेश देऊनही राज्य सरकारने याची अंमलबजावणी केलेली नाही. गृहमंत्री फडणवीस काय करीत आहेत? जर त्यांना दोन खाती संभाळता येत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा, अशी टीका तृप्ती देसाई यांनी केली.
यादरम्यान, न्यायालयाच्या निर्देशाची प्रत आम्हाला मिळत नाही, तोपर्यंत कोणत्याही महिलेला चौथऱ्यावर जाऊ देणार नाही, असा पवित्रा मंदिर समितीसह गावकऱ्यांनी घेतला होती.


शनी मंदिरातील चौथऱ्यावरच्या महिला प्रवेश आंदोलनाबाबत शनिवारी सकाळपासूनच वेगवान घडामोडी घडताना दिसत होत्या. उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शनिशिंगणापूर येथील चौथरा प्रवेशासाठी आंदोलन करणाऱ्या भूमाता ब्रिगेडच्या महिलांनी आजच शनी चौथऱ्यावर जाऊन घेण्याचे ठरविले होते. राष्ट्रवादी महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्रा वाघ यादेखील तृप्ती देसाई यांना आंदोलनात साथ करणार होत्या. मात्र, मंदिराच्या विश्वस्तांशी झालेल्या भेटीनंतर त्यांनी अचानकपणे आंदोलनातून माघार घेतली होती. गावकरी आणि मंदिर प्रशासनाला न्यायालयाचा निर्णय समजून घेण्यासाठी आणखी वेळ देणे गरजेचे असल्याचे सांगत चित्रा वाघ यांनी सामोपचाराची भूमिका घेतली होती.
नागरिकांच्या मुलभूत हक्कांचे रक्षण करणे ही सरकारचीच जबाबदारी असल्याचे स्पष्ट करीत धार्मिक स्थळी कोणताही भेदभाव करता येणार नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी राज्य सरकारला सांगितले होते. उच्च न्यायालयाकडून चपराक मिळाल्यानंतर जाग आलेल्या सरकारने मंदिर प्रवेशाबाबत लिंगभेद केला जाणार नाही तसेच या कायद्याची कठोर अंमलबजावणी करत महिलांना राज्य घटनेने दिलेल्या समान अधिकारांचे रक्षण केले जाईल, अशी हमी शुक्रवारी उच्च न्यायालयात दिली होती.

Story img Loader