उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर शनिशिंगणापूरमध्ये शनी चौथऱ्यावर दर्शनासाठी गेलेल्या भूमाता ब्रिगेडच्या महिला आणि स्थानिक गावकऱ्यांमध्ये शनिवारी जोरदार संघर्ष झालेला दिसला. यावेळी गावकरी आणि मंदिर प्रशासनाने पोलिसांच्या साथीने भूमाता ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना अक्षरक्ष: हुसकावून लावले. या प्रकारामुळे प्रशासनाने न्यायालयाचा आदेशाचा अवमान केल्याचे दिसून आले. दरम्यान, या घटनेनंतर दर्शन घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, असा पवित्रा घेणाऱ्या तृप्ती देसाईंना पोलिसांनी ताब्यात घेऊन पुण्याच्या दिशेने रवाना केले.
आज दुपारच्या सुमारास तृप्ती देसाई आणि राष्ट्रवादीचे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या नेतृत्त्वाखाली आंदोलकांनी शनी चौथऱ्यावर प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेथील सुरक्षारक्षक आणि गावकऱ्यांनी या सगळ्यांना जोरदार धक्काबुकी करत मागे रेटले. यावेळी भानुदास मुरकुटे यांनाही मारहाण करण्यात आली. सुरक्षारक्षक आणि गावकऱ्यांनी मुरकुटे यांचे कपडेही फाडले. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरूनच आपल्याला मारहाण केल्याचा आरोप मुरकुटे यांनी केला.
या सगळ्या प्रकारानंतर तृप्ती देसाई यांनी आम्ही काही झालेले तरी मागे हटणार नाही, असा पवित्रा घेतला होता. न्यायालयाचे आदेश असतानाही पोलिसांनी आम्हाला धक्काबुक्की करणाऱ्या गावकऱ्यांना मज्जाव केला नाही. हा न्यायालयाच्या आदेशाचा अवमान नाही का, असा सवाल करत तृप्ती देसाई यांनी पोलिस आणि गृहमंत्रीपदाचा कारभार सांभाळणाऱ्या देवेंद्र फडणवीसांवर गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला. न्यायालयाने आदेश दिल्यानंतरही महिलांना अशाप्रकारे रोखणे हे चुकीचे आहे. गावकऱ्यांसोबतच आम्हाला पोलीस आणि मंदिर प्रशासनाने रोखले. न्यायालयाने आदेश देऊनही राज्य सरकारने याची अंमलबजावणी केलेली नाही. गृहमंत्री फडणवीस काय करीत आहेत? जर त्यांना दोन खाती संभाळता येत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा, अशी टीका तृप्ती देसाई यांनी केली.
यादरम्यान, न्यायालयाच्या निर्देशाची प्रत आम्हाला मिळत नाही, तोपर्यंत कोणत्याही महिलेला चौथऱ्यावर जाऊ देणार नाही, असा पवित्रा मंदिर समितीसह गावकऱ्यांनी घेतला होती.
शनिशिंगणापूरमध्ये गावकरी आणि आंदोलनकर्त्यांमध्ये जोरदार धक्काबुक्की; तृप्ती देसाई पोलिसांच्या ताब्यात
नागरिकांच्या मुलभूत हक्कांचे रक्षण करणे ही सरकारचीच जबाबदारी आहे.
Written by लोकसत्ता टीम
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 02-04-2016 at 11:51 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp leader chitra wagh cancelled her protest shani shingnapur temple