सध्या महाराष्ट्र विधानसभेत पावसाळी अधिवेश सुरू आहे. अधिवेशनात आज ‘नगराध्यक्ष जनतेतून निवडला पाहिजे’ याबाबत घटनादुरुस्ती करण्याचा प्रस्ताव मांडला. या घटनादुरुस्तीबाबत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तुफान टोलेबाजी केली आहे. विधानसभेत भाषण करत असताना धनंजय मुंडे यांनी विरोधी पक्षनेते अजित पवारांची माफी मागून देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

एवढे जास्त सदस्य असूनदेखील आपल्याला उपमुख्यमंत्री पदावर बसावं लागत आहे, त्यामुळे मुख्यमंत्र्यांची नियुक्तीदेखील जनतेतून झाली पाहिजे, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी यावेळी केली आहे. देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून केलेल्या भाषणात धनंजय मुंडे म्हणाले की, “तुमच्या मनातील दु:ख काय आहे? बाकी कुणीही ओळखू शकत नसलं तरी मी ओळखतो. महाराष्ट्रात सत्तांतर घडवून भाजपाने काय मिळवलं? तेच मला कळतंच नाही. यापूर्वी ते कमीत कमी ‘विरोधी पक्षनेते’ या संविधानिक पदावर होते. आता ते उपमुख्यमंत्रीपदावर आहेत, पण हे पद संविधानिक नाही” अशी खोचक टीका धनंजय मुंडेनी केली आहे.

हेही वाचा- “कंबोज नावाच्या भोंग्याला…” रोहित पवारांवरील ट्वीटनंतर अमोल मिटकरींची खोचक टीका!

यावेळी उपमुख्यमंत्री पद असंविधानिक असल्याचा उल्लेख करत असताना धनंजय मुंडे यांनी बाजुला बसलेल्या अजित पवारांची माफीदेखील मागितली आहे. “माफ करा दादा” म्हणत धनंजय मुंडे फडणवीसांना उद्देशून पुढे म्हटलं की, “१२० सदस्य असूनदेखील तुम्हाला विरोधी पक्षात बसावं लागलं. याचं दु:ख तुमच्यापेक्षा अधिक आम्हाला होतं. आता तुम्ही सत्ता मिळवली, पण उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावं लागतंय. त्यामुळे नगराध्यक्ष जनतेतून निवडला जावा, असं तुम्हाला वाटत असेल तर मुख्यमंत्रीदेखील जनतेतून निवडला पाहिजे, अशी आमची मागणी आहे” असं धनंजय मुंडे यावेळी म्हणाले.