राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याची घोषणा केली होती. मात्र, पवारांच्या या भूमिकेला कार्यकर्त्यांसह नेतेमंडळीनी तीव्र विरोध केला. पक्षाच्या अध्यक्षपदी शरद पवारांनीच कायमस्वरुपी राहिलं पाहिजे, यावर कार्यकर्ते आणि नेते ठाम आहेत. अध्यक्षपदाच्या निवडीसाठी गठीत केलेल्या समितीची आज बैठक होती. या बैठकीतही शरद पवारांचा राजीनामा एकमताने फेटाळण्यात आला आहे. त्यानंतर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पक्षातील समितीने केलेला प्रस्ताव शरद पवार मान्य करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
अध्यक्षपदाच्या राजीनाम्याची घोषणा करताच शरद पवारांनी नव्या अध्यक्षाच्या निवडीसाठी समितीची घोषणा केली होती. आज (५ मे) मुंबईत राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात या समितीची बैठक झाली. यात शरद पवारांचा राजीनामा एकमताने फेटाळण्यात आला आहे. प्रफुल्ल पटेल यांनी हा राजीनामा फेटाळण्याचा प्रस्ताव ठेवला. यावर समितीतील सर्व सदस्यांनी एकमताने प्रस्तावाला मंजूरी दिली. समितीने शरद पवार यांचा अध्यक्षपदाचा राजीनामा फेटाळल्यानंतर आता स्वतः शरद पवार काय भूमिका घेतात याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.
दरम्यान, याविषयी प्रतिक्रिया देताना धनंजय मुंडे म्हणाले की, “कार्यकर्त्यांना जे अपेक्षित आहे तोच निर्णय येथे मान्य झाला आहे. शरद पवारांनी जी समिती गठीत केली होती, त्या समितीने एकमताने हा निर्णय केला आहे. साहेबांनी जो मनोदय व्यक्त केला होता तो समितीने अमान्य केला आहे. आमची सर्वांची इच्छा आहे, कार्यकर्त्यांची भावना आहे की त्यांनी पदावर राहावं. आम्ही विनंती करणार आहोत की त्यांनी पदावर राहावं. शेवटी सर्वानुमते समितीने केलेला ठराव आहे. मला असं वाटतं की, ज्यापद्धतीने शरद पवार लोकशाहीचं पालन करत आहेत, पक्षातील लोकशाहीतसुद्धा समितीने जो ठराव पारीत केलेला आहे तो शरद पवार मान्य करतील.”
हेही वाचा >> राष्ट्रवादी काँग्रेसमधील अध्यक्षपदाचं सूत्र ठरलं? ‘या’ फॉर्म्युल्याची जोरदार चर्चा!
“शरद पवारांचा राजीनामा एकमताने नामंजूर”
“शरद पवारांनी कुणालाही विश्वासात न घेता राजीनाम्याचा निर्णय घेतला. यानंतर त्यांनीच नेमलेल्या समितीने त्यांची वारंवार भेट घेतली आणि आज यावर बैठक घेऊन एक ठराव मंजूर केला. यानुसार, शरद पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा विचार केला होता. तो राजीनामा एकमताने नामंजूर करण्यात येत आहे. तसेच त्यांनीच अध्यक्ष म्हणून रहावं, अशी विनंती आम्ही करतो,” असं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं.