निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी शिंदे गट आणि उद्धव ठाकरे समर्थकांना शिवसेना हे नावही वापरता येणार नाही. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर उद्धव ठाकरे समर्थकांना धक्का बसला आहे. तर आम्ही पुढील रणनीती लवकरच ठरवू असे शिंदे गटाने सांगितले आहे. असे असताना माजी मंत्री तथा आमदार दिलीप वळसे पाटील यांनी राष्ट्रवादीकडून पहिली प्रतिक्रिया दिली आहे. निवडणूक आयोगाचा शिवसेना हे नाव वापरू न देण्याचा निर्णय अनाकलनीय आहे, असे वळसे पाटील म्हणाले आहेत. तसेच निवडणूक आयोगाने ही पोटनिवडणूक पुढे ढकलायला हरकत नाही, असे वळसे पाटील म्हणाले आहेत.
अजिबात न समजणारा हा निर्णय आहे. आमदार निलंबनाचा विषय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. असे असताना निवडणूक आयोगाने निवडणूक चिन्ह काही काळासाठी गोठवणे समजू शकतो. पण पक्षाचे नावच वापरता येणार नाही, हे न समजण्यासारखे आहे. आज या पक्षाचे विधानसभेत, लोकसभेत अनेक आमदार आणि खासदार आहेत. मग या लोकप्रतिनिधींनी काय करायचे? निवडणूक आयोगाला एवढीच अडचण वाटत असेल तर पोटनिवडणूक पुढे ढकलण्यास काय करकत आहे, असे दिलीप वळसे पाटील म्हणाले आहेत.
हेही वाचा>>> “निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय..,”धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याच्या निर्णयानंतर शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया
निवडणूक आयोगाने काय निर्णय दिला?
निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला आहे. आयोगाने घेतलेल्या निर्णयानुसार आता शिंदे गट आणि उद्धव ठाकरे समर्थकांना आगामी अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी शिवसेना हे नाव वापरता येणार नाही. तसेच दोन्ही गटांना धनुष्यबाण या चिन्हाचाही वापर करता येणार नाही. निवडणूक आयोगाकडून दोन्ही गटाला दोन वेगवेगळी चिन्हे दिली जातील.