NCP Spilt Ajit Pawar News : राज्यात राजकीय उलथापालथ झाली आहे. विरोधी पक्षनेते असलेले अजित पवार आता सत्तेत सहभागी होत उपमुख्यमंत्री बनले आहेत. शिवसेना पाठोपाठ राष्ट्रवादीतही फूट पडल्याने महाराष्ट्राच्या राजकारणासाठी मोठा धक्का मानला जातोय. कारण, भाजपाकडून राष्ट्रवादीवर गेले काही दिवस भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात येत होते. राष्ट्रवादीने ७० हजार कोटींचा घोटाळा केल्याचं खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते. यावरून आता राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनीही भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे. प्रसिद्धी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
अजित पवारांचं बंड हे भाजपाच्या ‘ऑपरेशन लोटस’चा भाग असल्याची टीका केली जातेय. यावरूनच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी टीका केली आहे. ते म्हणाले की, “भाजपाच्या नेत्यांनी राष्ट्रवादीवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून केसेस दाखल केल्या होत्या. छत्रपती संभाजी नगरमध्ये बैलगाडीत पुरावे ठेवून ते जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. राष्ट्रवादीने ७० हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोपही करण्यात आला. आता त्याच लोकांनी (भाजपा) यांच्यासोबत (अजित पवार)सरकार बनवलं आहे. त्यामुळे हे क्लिन झाले आहेत. भाजपाच्या वॉशिंगमध्ये टाकलं आणि क्लिन करून घेतले”, अशी टीका खडसे यांनी केली.
हेही वाचा >> “…तर विरोधी पक्षनेता काँग्रेसचा होईल”, जयंत पाटील यांचं वक्तव्य
गेलेल्या आमदारांविषयी जयंत पाटील काय बोलले?
काही वेळापूर्वी जयंत पाटलांनीही माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी गेलेल्या आमदारांना परत घेणार का यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “गेलेल्या आमदारांना पुन्हा संधी दिली जाईल, असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले. “आम्हाला कोणावर अन्याय करायचा नाही. त्यांना परत येण्याकरता आम्ही पूर्ण संधी देऊ”, असं आवाहन जयंत पाटील यांनी केलं. “परंतु, जे येणार नाहीत. जे पार्टीची लाईन सोडून जातात (पक्षाच्या धोरणाविरोधात काम करतात) त्यांच्यावर आवश्यक कारवाई आम्ही करू. सगळेच आमदार नाहीत, परंतु, बहुतेक आमदार आमच्या संपर्कात आहेत”, असंही जयंत पाटील म्हणाले.