भाजपाचे नेते तथा मंत्री गिरीश महाजन आणि राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांच्यात वाद पेटला आहे. गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांचे पूत्र निखिल खडसे यांच्या मृत्यूबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ‘खडसेंच्या मुलाने आत्महत्या केली की हत्या झाली. मला जास्त बोलायला लावू नका,’ असे महाजन म्हणाले आहेत. याच कारणामुळे खडसेदेखील आक्रमक झाले आहेत. महाजनांच्या वक्तव्यामुळे माझे कुटुंबीय दुखावले आहे. मला फार वेदना झाल्या आहेत, अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली आहे. तसेच महाजनांवर टीका करताना फर्दापूरच्या गेस्ट हाऊसमध्ये काय झाले होते, हे तेव्हा वर्तमानपत्रांत छापून आले होते. मात्र मी त्याचा कधीही उल्लेख केलेला नाही. महाजनांची कृत्यं मी डोळ्यांनी पाहिली आहेत, असे मोठे विधान केले आहे. ते २१ नोव्हेंबर रोजी माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.
हेही वाचा >>> “शिवाजीमहाराज जुने, तर गडकरी नवे आदर्श” म्हणणाऱ्या राज्यपालांना मनसेकडून उत्तर, म्हणाले “हिमालयातून आलेल्या….”
“गिरीशची अनेक कृत्यं मी उघड्या डोळ्यांनी पाहिलेली आहेत. अगदी फर्दापूरच्या गेस्ट हाऊसला झालेली भानगड तेव्हा वर्तमानपत्रांमध्येही आली होती. मी तेव्हा फर्दापूरच्या गेस्ट हाऊसमध्ये होतो. मात्र मी कधीही त्याचा उल्लेख केला नाही. गिरीश महाजन यांचे किती लोकांशी प्रेमाचे संबंध आहेत, याचाही मी कधी उल्लेख केला नाही. प्रेमाचे नाते असू शकते,” असे एकनाथ खडसे म्हणाले आहेत.
हेही वाचा >>> VIDEO: राहुल गांधींचं भाषण सुरु असतानाच गर्दीतून एकजण उभा राहिला, म्हणाला “कशाला भाषांतर…”, त्यानंतर झालं असं काही
निखिल खडसे यांच्या मृत्यूबाबत महाजनांनी केलेल्या विधानावरही खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “अत्यंत नीच आणि हलकट प्रवृत्तीने गिरीश महाजन यांनी असे प्रश्न उपस्थित केले आहेत. यावर महाजन यांची मनोवृत्ती लक्षात येते. मी गिरीश महाजन यांच्या मुलाबाबतीत मी कधीही बोललो नाही. तुम्ही माझ्या घरात घराणेशाही आहे, असे म्हणता. तर मग तुमच्या घरात काय आहे? साधनाताई २७ वर्षांपासून सरपंच, जिल्हापरिषद सदस्य, १५ वर्षांपासून नगराध्यक्ष आहेत. तुम्हाला दुसरे कोणी मिळाले नाही का? तुम्हाला मुलगा असता तर सून आणि मुलगा असे दोघेही राजकारणात असते. मुलगा असता तर मी त्याला आशीर्वाद दिला असता, असे मी म्हणालो होतो. असे असताना निखिल भाऊची हत्या झाली की आत्महत्या, असे प्रश्न विचारणे चुकीचे आहे,” अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली.
हेही वाचा >>> “कुटुंबाला वेदना झाल्या, मुलगी रडत होती, सुनेला धक्का बसला”, गिरीश महाजनांच्या विधानानंतर एकनाथ खडसे भावूक
“गिरीश महाजन यांनी असे वक्तव्य करणे म्हणजे त्यांच्या कुत्सित मनोवृत्तीचे लक्षण आहे. राजकीय द्वेषापोटी माणूस किती खाली जाऊ शकतो, हेच यातून दिसते. हा सत्तेचा माज आहे. सत्तेची मस्ती आहे. जनता ही मस्ती उतरवल्याशिवाय राहणार नाही,” अशी टीकादेखील खडसे यांनी केली.