स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा आज ( ३ जून ) नववा स्मृतिदिन. त्यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, आमदार एकनाथ खडसे गोपीनाथ गडावर गेले होते. तेव्हा भाजपाच्या नेत्या, पंकजा मुंडे यांची एकनाथ खडसे यांनी भेट घेतली आहे. यावेळी खडसे आणि मुंडे यांच्यात अर्धा तास चर्चा झाली. या बैठकीनंतर पंकजा मुंडेंनी सूचक वक्तव्य केलं आहे. “इथे वादळ येणार होतं, पण त्याची दिशा बदलली,” असं पंकजा मुंडेंनी म्हटलं. त्या प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.
“कोणत्याही राजकारण्याला किंवा बलाढ्य नेत्याला निमंत्रण दिलं नाही. फक्त भजन किर्तन आणि गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणाऱ्यांसाठी कार्यक्रम ठेवला आहे. त्या नात्याने एकनाथ खडसे गडावर आले होतं. कारण, एकनाथ खडसे करोनात येऊ शकले नाहीत. गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांना या गडावर येण्याचा अधिकार आहे. एकनाथ खडसे गोपीनाथ मुंडेंचं सहकारी असल्याने दर्शनाला आले होते,” असं स्पष्टीकरण पंकजा मुंडे यांनी दिलं.
हेही वाचा : “…यापेक्षा थुंकणं चांगलं”, संजय राऊतांच्या वक्तव्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले…
“गोपीनाथ मुंडे यांचं वादळी जीवन होतं. मी वादळाची लेक आहे. इथे वादळ येणार होतं. मात्र, त्याची दिशा बदलली आहे. असं आमचं आयुष्य आहे,” असं विधान पंकजा मुंडे यांनी केलं.
हेही वाचा : “हे कसलं हिंदुत्त्व?” त्र्यंबकेश्वर मंदिरप्रकरणी संजय राऊतांचा सवाल, म्हणाले “कोणीतरी उथळ पोरं येतात आणि…”
दरम्यान, राष्ट्रीय समाज पक्षाचा दिल्लीत एक कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी केलेल्या एका वक्तव्यावरून राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. “मी भाजपाची आहे, पण भाजपा थोडाच माझ्या एकट्याचा पक्ष आहे. महादेव जानकरांचा स्वत:चा पक्ष आहे. तसा भाजपा कुणा एकट्याचा नाही. हा पक्ष खूप मोठा आहे. मी त्याची एक कार्यकर्ता आहे,” असं पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या.