पोलिस अधिकारी रश्मी शुक्ला यांना पोलिस महासंचालकपदी बढती दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. रश्मी शुक्ला यांनी माझा अनधिकृतरित्या फोन टॅप केला होता. त्यांची या पदावर नियुक्ती केल्यानंतर आता अधिकृतरित्या फोन टॅप केले जातील का? अशी शंका एकनाथ खडसे यांनी उपस्थित केली. तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रश्मी शुक्ला यांनी राखी बांधली होती, याची आठवण करून देताना ते म्हणाले की, फडणवीस यांनी आपल्या बहिणीचे रक्षण करून तिला या पदाची ओवाळणी दिली आहे.
हे वाचा >> विश्लेषण : रश्मी शुक्ला यांच्याशी संबंधित फोन टॅपिंग प्रकरणाचे काय होणार?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिर्डी येथील दोन दिवसांचे शिबिर आज संपन्न झाले. यावेळी माध्यमांशी बोलत असताना एकनाथ खडसे यांनी ही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “महाष्ट्रात एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे सरकार आल्यानंतर रश्मी शुक्ला यांना बढती मिळेल, हे अपेक्षित होते. रश्मी शुक्ला यांनी माझा फोन तब्बल ६२ दिवस कुठलीही परनवानगी न घेता अनधिकृतपणे टॅप केला होता. मी वारंवार सभागृहात यासंबंधी प्रश्न विचारले. पण मला आतापर्यंत काहीही उत्तर मिळालेले नाही. पण निवडणुका लक्षात घेता, आपला जवळचा अधिकारी असला पाहीजे यादृष्टीकोनातून रश्मी शुक्ला यांची पोलिस महासंचालकपदी नेमणूक झाली असावी.”
आणखी वाचा >> विश्लेषण : रश्मी शुक्लांवरील सर्व गुन्हे रद्द झाले.. पुढे?
एकनाथ खडसे पुढे म्हणाले, “रश्मी शुक्ला यांच्यासाठी जंगजंग पछाडले गेले. त्यांना क्लीन चीट देण्यासाठी सरकारने सर्वोच्च न्यायालयात आपले म्हणणे ताकदीने मांडले नाही. आता त्यांना राज्याचे पोलिस महासंचालक पद देण्यात आले आहे. यापूर्वी त्या विनापरवानगी फोन टॅप करायच्या. त्यातून पुढे येणारी माहिती त्या कुणाला द्यायच्या? हे अद्यापही निष्पन्न झालेले नाही. आता तर फोन टॅपिंगची अधिकृत परवानगी मिळालेली आहे. त्यामुळे विरोधकांनी फोनवर बोलताना सावध राहण्याची गरज आहे. आमच्यासारख्यांनी आता कुठल्या माध्यमातून बोलायचं असा प्रश्न उभा राहिला आहे. रश्मी शुक्ला यांनी कायद्याच्या चौकटीत अपेक्षित असलेले काम करावे. विरोधकांना छळण्याचे किंवा त्यांच्यावर लक्ष ठेवण्याचे काम करू नये”, असे आवाहन खडसे यांनी केले.
रश्मी शुक्लांना भावाकडून ओवाळणी
“रश्मी शुक्ला यांनी देवेंद्र फडणवीस यांना रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधलेली होती. मानलेली बहिण अशी रश्मी शुक्ला यांची ओळख आहे. सत्तेमध्ये असताना अनेक महिला अधिकारी राखी बांधत असतात. पण हे नाते तंतोतंत जपण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. आपल्या बहिणीचे रक्षण करून एकप्रकारे रक्षाबंधनाची ओवाळणीच फडणवीस यांनी त्यांना दिली”, असेही एकनाथ खडसे म्हणाले.