महाराष्ट्र विधानसभेत सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात सोमवारी सत्ताधारी आणि विरोधक पक्षांमध्ये चांगलीच फटकेबाजी पाहायला मिळाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह अनेक नेत्यांनी जोरदार भाषणं केली आहेत. दरम्यान, बंडखोर आमदार आणि पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनीदेखील भाषण केलं आहे. यावेळी गुलाबराव पाटलांनी महाविकास आघाडी सरकारमधील तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आपल्याला वेळोवेळी मदत केली, असं विधान केलं आहे.
खरं तर, शिवसेना पक्षात बंडखोरी झाल्यानंतर गुलाबराव पाटलांसह अनेक बंडखोर आमदारांनी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवारांवर आरोप केले होते. अजित पवारांनी निधी वाटप करताना पक्षपात केला, ते आपल्याच आमदारांना निधी देत होते, असा आरोप बंडखोर आमदारांनी केला होता. पण सोमवारी विधानसभेत गुलाबराव पाटलांनी अजित पवारांनी वारंवार मदत केल्याची कबुली दिली.
हेही वाचा- “कंबोज हे काजू, बदाम आणि खारका खाऊन…” अजित पवारांच्या कामांचा उल्लेख करत मिटकरींची टीका, म्हणाले…
यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी टोला लगावला आहे. खरे गुलाबराव पाटील नेमके कोणते? असा सवाल मुश्रीफांनी उपस्थित केला आहे. अजित पवार निधी देत नाहीत, म्हणून आम्ही बंड केला म्हणणारे गुलाबराव पाटील खरे की आज विधानसभेत अजित पवारांनी सहकार्य केलं म्हणणारे गुलाबराव पाटील खरे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
हेही वाचा- “आधी अजित पवारांची माफी, मग उपमुख्यमंत्री पदावरून फडणवीसांवर निशाणा” धनंजय मुंडेंची तुफान टोलेबाजी!
गुलाबराव पाटील नेमकं काय म्हणाले?
“महाविकास आघाडी सरकारमध्ये पाणी पुरवठा मंत्री म्हणून कार्यरत असताना, आपण कधी पक्ष पाहिला नाही किंवा संबंधित आमदार कोणत्या पार्टीचा आहे? हे पाहिलं नाही. ज्यांनी माझ्याकडे पाण्याची योजना आणली. त्यांना मी मदत केली. ही मदत मी माझ्या घरून केली नाही. यामध्ये केंद्राकडून ५० टक्के मिळत होते. त्यावेळचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मला वारंवार मदत केली. त्यांनी मदत केली नाही, असं सभागृहातील कोणताही आमदार सांगू शकत नाही” अशी कबुली गुलाबराव पाटलांनी विधानसभेत दिली.