NCP Hasan Mushrif ED Raid : कथित आर्थिक गैरव्यवहारप्रकणी राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरावर आज (११ जानेवारी) छापेमारी करण्यात आली. सकाळी ७ वाजता सुरू असलेली ही छापेमारी तब्बल १२ तासांनी संपली. मुश्रीफ यांच्या कागल आणि पुण्यातील घरावर ही छापेमारी करण्यात आली. दरम्यान, ईडीच्या अधिकाऱ्यांची छापेमारी संपल्यानंतर हसन मुश्रीफ यांचे पुत्र नावीद मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ही कारवाई राजकीय हेतूने प्रेरित असून जोपर्यंत आमच्या मागे जनता आहे, तोपर्यंत आमच्या केसालाही कोणी धक्का लावू शकणार नाही, असे नावीद मुश्रीफ म्हणाले. ते माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.
हेही वाचा >>> हसन मुश्रीफ यांच्या घरावर तब्बल १२ तास छापेमारी! चौकशीत ईडीच्या हाती नेमकं काय लागलं?
“ईडीचे अधिकारी सकाळी साधारण सात वाजता आले होते. जोपर्यंत आमच्या पाठीशी जनता आहे, तोपर्यंत आमच्या केसालाही धक्का लागणार नाही. ईडीच्या अधिकाऱ्यांना वरून फोन येत होते. त्याप्रमाणे ते कारवाई करत होते. ज्यांनी आमच्याविरोधात कारवाईचे षडयंत्र रचले, त्यांना जनता उत्तर देईल. आमच्यावर कारवाई होणार, हे मागील चार दिवसांपासून आमच्या कार्यकर्त्यांना सांगण्यात येत होते. ही कारवाई राजकीय हेतू ठेवून करण्यात आल्यामुळे अधिकाऱ्यांवर दबाव होता,” अशी प्रतिक्रिया नावीद मुश्रिफ यांनी दिली.
हेही वाचा >>> शिक्षक मतदारसंघ निवडणूक : भाजपा-शिंदे गटाला रोखण्यासाठी महाविकास आघाडीचा प्लॅन काय? जयंत पाटील म्हणाले “आम्ही सर्व…”
“आम्ही ईडीच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीला सहकार्य केले आहे. त्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची आम्ही उत्तरं दिली आहेत. आमच्या घरासमोर जे लोक उभे होते, त्यांचे मी आभार मानतो. चौकशी शांततेत पार पडलेली आहे. ही धाड राजकीय हेतूने झालेली आहे,” असेही नावीद मुश्रीफ म्हणाले.
हेही वाचा >>> ईडीने छापेमारी केलेल्या हसन मुश्रीफ यांची एकूण संपत्ती माहीत आहे का?
काय आहे प्रकरण?
काही महिन्यांपूर्वी भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप केले होतं. २०२० साली आप्पासाहेब नलावडे साखर कारखाना पारदर्शक पद्धतीने व्यवहार न होता ब्रिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडला चालवण्यासाठी दिला. या कंपनीला साखर कारखाना चालवण्याचा कोणताही अनुभव नव्हता. मात्र, तरी सुद्धा या कंपनीला कंत्राट दिल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला होता. यासह अन्य आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांखाली ईडीने छापेमारीची कारवाई केली आहे.