मराठा आणि ओबीसी समाजात सध्या आरक्षणावरून मतभेद आहेत. दोन्ही समाजातील नेते एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. तर सत्तारुढ पक्षातील नेत्यांनीही विरोधी भूमिका मांडली आहे. त्यामुळे मराठा आणि ओबीसी समाजातील भांडणात सरकारची नेमकी भूमिका काय हा प्रश्न अनुत्तरीत आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी सरकारला धारेवर धरलं आहे. आज त्यांनी पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर चर्चा केली.
मराठा आणि ओबीसी समाजातील मतभेदावरून जयंत पाटील म्हणाले की, ज्येष्ठ मंत्री राज्यभर सभा घेतात आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यावर काहीच बोलत नाहीत. म्हणजे हे एकत्र बसून ठरवून दोन व्यासपीठ महाराष्ट्रात तयार करत आहेत. दोन्ही बाजूची फसगत करायची आणि आगामी निवडणुकीत महाराष्ट्रातील नरेटिव्ह बदलायचा यांचा प्रयत्न यातून दिसतो.
हेही वाचा >> “सत्तेतले लोक आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून जानेवारी महिन्यात…”, रोहित पवारांचा इशारा
राष्ट्रवादीने एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये यासंदर्भात म्हटलं आहे की, राज्याचे मुख्यमंत्री व त्यांचे मंत्री यांच्यात आरक्षणाच्या बाबतीत एकवाक्यता दिसत नाही. राज्याचे सामाजिक वातावरण बिघडवण्याचे व जाती- जातींमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम सध्या केले जात आहे. मंत्री मंडळात जे एकत्र बसतात त्यांनी एकमुखाने भूमिका मांडली पाहिजे, पण तसे होताना दिसत नाही. मंत्री मंडळातील मंत्री आतमध्ये बसून भूमिका मांडण्यास कमी पडत आहेत. म्हणून त्यांना बाहेर येऊन आपली भूमिका मांडावी लागत आहे. दोन्ही उपमुख्यमंत्री यावर काहीच बोलत नाहीत. म्हणजे हे सर्व ठरवून सुरू आहे की काय? असा प्रश्न निर्माण होतो. ओबीसींच्या बाबतीत व मराठ्यांच्या बाबतीत सरकारची काय भूमिका आहे हे मुख्यमंत्र्यांनी योग्य पद्धतीने स्पष्ट केले पाहिजे. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात अशांतता निर्माण झाली आहे. त्यावर सरकारने योग्य ती पाऊले उचलणे गरजेचे आहे. राज्यात सलोख्याचे वातावरण निर्माण करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार आहोत.
हेही वाचा >> “बिहारप्रमाणे महाराष्ट्रातही आरक्षणाची मर्यादा वाढवा, त्याआधी…”, मनोज जरांगेंचा राज्य सरकारला सल्ला
ट्रॅक्टर रॅली काढणार
“राज्यात अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पीक विम्याच्या बाबतीत सरकारने अनेक घोषणा केल्या. पण मदत मात्र त्यांच्यापर्यंत पोहोचलेली नाही, ही शेतकऱ्यांची थट्टा आहे. विदर्भात तुरीच्या पिकांचे, नंदुरबारमध्ये मिरचीचे तर जळगाव व नाशिकमध्ये द्राक्ष व कांद्याचे नुकसान झाले आहे. तसेच, या अवकाळी पावसामुळे जनावरांचेदेखील फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या सर्व नुकसानीचे पंचनामे करण्याची घोषणा सरकारने केली असली तरी त्याची अंमलबजावणी होईल असे वाटत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागण्या व त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शेतकरी आक्रोश मोर्चा व ट्रॅक्टर रॅली काढण्यात येणार आहे. उद्या गुरुवार, ३० नोव्हेंबर रोजी जळगाव, शुक्रवार १ डिसेंबर रोजी नाशिकच्या दिंडोरी येथे तर ५ डिसेंबर रोजी अमरावती येथे हा मोर्चा निघेल व राज्य स्तरावरील पक्षाचे महत्वाचे नेते त्यात सहभागी होतील”, अशी माहिती जयंत पाटलांनी दिली.