Jitendra Awhad MLA Resignation: भाजपाच्या महिला पदाधिकाऱ्याच्या तक्रारीनंतर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. या कारवाईनंतर आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचं आव्हाड यांनी जाहीर केलं आहे. या एकूण घटनेबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर हा गुन्हा दाखल झाला आहे. याचा अर्थ लोकांना समजला आहे. आव्हाडांना बदनाम करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे”, असा आरोप जयंत पाटील यांनी केला आहे. आमदारकीचा राजीनामा देण्याचा आव्हाडांचा निर्णय पक्षाला मान्य नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
“सरकार पोलिसांचा गैरवापर करत आहे, हे अत्यंत दुर्देवी आहे. मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यादेखत जितेंद्र आव्हाड गर्दीतून वाट काढत असताना हा प्रकार घडला आहे. त्यात कुठलीही विनयभंगाची भावना किंवा कृती असल्याचं दिसून येत नाही”, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. मर्यादा सोडून कोणाचं किती ऐकायचं, याचा विचार पोलिसांनी केला पाहिजे, असेही आवाहन त्यांनी ‘टीव्ही ९ मराठी’ या वाहिनीशी बोलताना केले आहे.
“राज्यात सध्या जितेंद्र आव्हाड विरुद्ध एकनाथ शिंदे अशी परिस्थिती आहे. आव्हाडांवरील कारवाईनंतर त्यांची लोकप्रियता वाढत चालली आहे. त्यामुळे भविष्यात सरकारवर नामुष्की ओढवू शकते” असे पाटील म्हणाले आहेत.
जितेंद्र आव्हाडांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल! ठाणे शहरात ठिकठिकाणी जाळपोळ; पाहा धक्कादायक Video
महाराष्ट्र महिला आयोगाच्या सदस्या आणि भाजपाच्या पदाधिकारी रिदा रशीद यांनी ट्वीटरवरुन एक व्हिडीओ शेअर करत आव्हाड यांनी चारचौघांमध्ये आपल्याला अपमानित केल्याचा आरोप केला आहे. “राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सर्वांसमोर मला अपमानित केलं. “तू इथं काय करतेस” असं माझा हात पकडून त्यांनी म्हटलं,” असा आरोप रिदा रशीद यांनी केला आहे.