राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यापासून आतापर्यंत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस विरुद्ध भाजपा असा सामना रंगला आहे. करोना काळात तर या सामन्याला आणखी धार मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. विरोधी पक्ष भाजपाने महाविकास आघाडी सरकार सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरल्याची वारंवार टीका केली आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र सरकारचं कौतुक केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी राज्यातील भाजपा नेत्यांना कानपिचक्या दिल्या आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्य सरकारच्या कामाचं कौतुक केल्याने राज्यातील भाजपा नेत्यांना कळलं पाहीजे असा पलटवार त्यांनी केला आहे.
“देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांना कळलं असेल राज्यात कशा पद्धतीने काम सुरु आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र सरकार चांगलं काम करतंय. मुंबईची स्थितीही सुधारली आहे. नुसता विरोधाला विरोध करणं चुकीचं आहे. मोदींनी केलेल्या कौतुकामुळे फडणवीस आणि चंद्रकांत पाटलांच्या आरोपात कमतरता येईल अशी आशा आहे”, असं मत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यानी शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधत करोना स्थितीचा आढावा घेतला होता. महाराष्ट्र करोनाच्या दुसऱ्या लाटेविरुद्ध सक्षमपणे लढा देत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कामाचं कौतुक केलं होतं.
भाजपा कार्यकर्त्याकडून तुंगा कोविड रुग्णालय व्यवस्थापकाला मारहाण; साहित्याची तोडफोड
दुसरीकडे विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सरकारवर टीकेचे बाण सोडले आहेत. “कौतुकाची प्रेसनोट मुख्यमंत्री कार्यालयातून आली आहे, पंतप्रधान कार्यालयातून नाही. आम्हाला कौतुक वाटत नाही पण आमचं म्हणणं हेच आहे की, मुंबईसह महाराष्ट्रामध्ये आरोग्यव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. आजही रुग्णांना, आयसीयू बेड, ऑक्सिजन असलेले बेड मिळत नाहीत, रेमडेसिविर मिळत नाही.” अशी टीका त्यांनी केली.