हसन मुश्रीफ यांच्या कागलमधल्या घरावर पुन्हा एकदा ईडीने छापा मारला आहे. मुश्रीफ यांच्या निवासस्थानी ईडीचे अधिकारी पहाटे पाचच्या सुमारास आले आणि त्यांनी कारवाई सुरू केली आहे. ही कारवाई किती वेळ चालणार हे समजू शकलेलं नाही. मात्र ही कारवाई झाल्याची माहिती समोर आली आहे. आमदार हसन मुश्रीफ यांचे कुटुंबीय घरात होते. आता कारवाईच्या दरम्यान काय काय विचारणा केली जाते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. या सगळ्याबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली असून ही बाब धक्कादायक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
काय म्हटलं आहे जयंत पाटील यांनी?
ईडीने अशा प्रकारे पहाटे हसन मुश्रीफ यांच्या घरावर पुन्हा एकदा धाड टाकली आहे ही बाब धक्कादायक आहे. कितीवेळा धाड टाकली जाणार आहे? मुंबई हायकोर्टाने याच प्रकरणांची सुनावणी झाली त्यावेळी कोर्टाने मतं व्यक्त केली की एजन्सीजचा गैरवापर केला जातो आहे. लोकांच्याही या गोष्टी लक्षात आल्या आहेत ही मतं हायकोर्टाने व्यक्त केल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी अशा प्रकारे धाडसत्र राबवलं जातं हे आश्चर्यकारक आहे. हसन मुश्रीफ यांना त्रास द्यायचा आणि काहीही करून अडचणीत आणायचं हाच अजेंडा यामागे दिसून येतो आहे याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. अशा पद्धतीने भारतात कारवाया केल्या जाणार असतील तर सामान्य माणसाचं जगणं कठीण होईल. सत्ताधाऱ्यांना कुणी विरोधच करायचा नाही ही मानसिकता आहे असंही जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
आज आणि उद्या अधिवेशनाला सुट्टी आहे. सोमवारी अधिवेशनात आम्ही हा मुद्दा मांडण्याचा विचार करतो आहोत. सोमवारी आम्ही आमच्या पक्षातल्या नेत्यांशी चर्चा करू आणि त्यानंतर हा प्रश्न अधिवेशनात उपस्थित केला जाईल असंही जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. हसन मुश्रीफ यांना काहीही करून अडकवायचं आणि त्रास द्यायचा अशा गोष्टी सुरू आहेत. देशात आणि महाराष्ट्रात असं वातावरण कधीही नव्हतं असंही जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. टीव्ही ९ मराठीला प्रतिक्रिया देताना जयंत पाटील यांनी हे स्पष्ट केलं आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
कोल्हापुरातील साखर कारखाना खरेदी व्यवहारात गैरप्रकार झाल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. या व्यवहारात काळा पैसा गुंतविण्यात आल्याचेही ते म्हणाले होते. तसेच मुश्रीफ यांच्या निकटवर्तीयांनी साखर कारखाना खरेदी केल्याचा आरोपही त्यांनी केला होता. त्यानंतर ईडीकडून मुश्रीफ यांच्या पुणे आणि कोल्हापुरातील मालमत्तांवर छापे टाकून कारवाई करण्यात आली होती.