मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना पक्षात उभी फूट पडली. एकनाथ शिंदेंनी-भाजपाबरोबर जात सत्ता स्थापन केली. त्यामुळे शिवसेनेत फूट पाडण्यास भाजपाच कारणीभूत असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात येतो. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यात भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गोपीचंद पडळकर एका कार्यक्रमात बोलत होते. तेव्हा त्यांनी म्हटलं की, “भाजपाचा झेंडा आज राष्ट्रवादीच्या कार्यालयावर लागला आहे. मी तुम्हाला विश्वासाने सांगतो, हाच भाजपाचा झेंडा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या घरावर दिसेल. त्यानंतर मुंबईच्या राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात नेमका झेंडा कोणाचा लागणार, यामुळे त्यांच्यात वाद होईल. त्यात बहुमताने कार्यकर्ते म्हणतील आता भाजपात प्रवेश करूया,” असेही गोपीचंद पडळकर म्हणाले.

हेही वाचा : जयदत्त क्षीरसागर यांची ठाकरे गटातून हकालपट्टी? बीडचे जिल्हाध्यक्ष म्हणतात, “त्यांचा शिवसेनेशी…!”

दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी शिवसेनेत फूट पाडल्यानंतर भाजपाचं पुढील लक्ष राष्ट्रवादी असल्याचं सांगितलं होतं. “शिवसेना एक मोठा पक्ष होता. त्यांच्यावर वेगवेगळ्या पद्धतीने दबाव आणून, राजकारण करून तो पक्ष फोडण्यात आला. पण, दुसरं लक्ष राष्ट्रवादी काँग्रेस असू शकतो हे मी बोललो होतो. कारण, शिवसेनेनंतर दुसरा मोठा पक्ष राष्ट्रवादी आहे,” असा दावा रोहित पवारांनी केला होता.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp leader jayant patil home bjp flag say bjp leader gopichand padalkar ssa