माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना नुकतंच न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. अखेर ११ महिन्यांनी त्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र, अनिल देशमुखांना अद्याप सीबीआय न्यायालयाकडून जामीन मिळाला नाही, त्यामुळे ते तुरुंगातच आहेत. अनिल देशमुखांना ईडीकडून दाखल केलेल्या गुन्ह्यात जामीन मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काही लोकांना अटक करायचीच आहे, असं ठरवून अनिल देशमुखांना अटक करण्यात आली, असं विधान जयंत पाटलांनी केलं आहे. ते ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीशी बोलत होते. आज ईडीकडून दाखल केलेल्या गुन्ह्यात जामीन मिळाला आहे, भविष्यात सीबीआयचाही जामीन मिळण्याची शक्यता आहे, असं लोकं म्हणतात. सीबीआयचं कोर्ट त्यावर निर्णय घेईल, त्यानंतर ते बाहेर येतील, असंही जयंत पाटील यावेळी म्हणाले.
हेही वाचा- “सकाळी नऊ वाजता बांग देणाराही आता…” राधाकृष्ण विखे पाटलांचं संजय राऊतांवर टीकास्र!
अनिल देशमुखांच्या अटकेबाबत भाष्य करताना जयंत पाटील म्हणाले की, अनिल देशमुख अटक प्रकरणात पहिल्यांदा सीबी आली. त्यानंतर त्यांच्यावर आरोप करण्यात आले. मग कुणीतरी पत्र लिहून देशमुखांवर १०० कोटींचा आरोप केला. या घटनाक्रमानंतर ईडीने त्यांना अटक केली. हे सगळं जाणूनबुजून केलेलं काम होतं. काही लोकांना अटक करायचीच, असं ठरवून अनिल देशमुखांना अटक करण्ययात आली.
हेही वाचा- Anil Deshmukh : माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना दिलासा; ११ महिन्यांनंतर जामीन मंजूर
जयंत पाटील पुढे म्हणाले, “अनिल देशमुखांना जामीन मिळाला याचं समाधान आहे. परंतु अद्याप कोणताही आरोप सिद्ध झाला नाही. कुणीतरी आरोप करतो म्हणून त्यांना अटक झाली. याबाबत अद्याप कोणताही पुरावा नाही. तरीही आयुष्याची ४० वर्षे राजकारणात घालवणाऱ्या नेत्याला इतके महिने तुरुंगात राहावं लागलं, याचा आम्हाला खेद आहे. अशा पद्धतीने कोणताही आरोप सिद्ध होण्याआधीच लोकांना तुरुंगात जावं लागतंय. हे आपल्या देशात घडतंय, असंही पाटील म्हणाले.